४ मास वेतन न मिळाल्याने सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील १७ वैद्यकीय अधिकार्‍यांचे त्यागपत्र !

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना महामारीच्या काळात काम केलेले वैद्यकीय अधिकारी दुर्लक्षित !
‘गरज सरो वैद्य मरो’ ही म्हण सार्थ करणारे प्रशासन !
वैद्यकीय अधिकार्‍यांवर त्यागपत्र देण्याची पाळी येणे प्रशासनासाठी लज्जास्पद !
ज्यांनी जिवाचा धोका पत्करून कोरोना महामारीच्या काळात काम केले, त्यांनाच असे वार्‍यावर सोडणे शोभते का ?

सिंधुदुर्ग – कोरोना महामारीच्या काळात विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले; मात्र या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना ४ मास वेतन दिले न गेल्याने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यागपत्र दिल्याचे वृत्त असतांनाच आता मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल चंद्रकांत साळुंखे यांनीही ४ मास वेतन न मिळाल्याने त्यागपत्र दिल्याचे समजते.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवेत रूजू झालेल्या १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे त्यागपत्र सुपुर्द केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात नसून प्रतिदिन ५० च्या आसपास नवीन रुग्ण आढळत असून काही रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकार्‍यांनी मानधन न मिळाल्याने त्यागपत्र दिल्याची माहिती मिळाल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगितले. ‘जिल्हा प्रशासन आणि शासन रुग्ण अन् त्यांचे नातेवाईक यांच्या जिवाशी खेळत आहेत. सेवा करणार्‍या वैद्यांना वेतन मिळत नसेल, तर त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची ?, असा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेणार्‍या सत्ताधार्‍यांनी याविषयी तातडीने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.