इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरवण्यासाठी शिक्षण खात्याकडून मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध
पणजी, १५ ऑक्टोबर (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवार, १८ ऑक्टोबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग भरवले जाणार असल्याची घोषणा केल्यानंतर शिक्षण खात्याने प्रत्यक्ष वर्ग भरवण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. ही मागदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रारंभी हे वर्ग प्रत्यक्ष आणि ‘ऑनलाईन’ या दोन्ही स्वरूपात (हायब्रीड मोडमध्ये) घ्यावेत.
२. प्रत्यक्ष वर्गात सहभागी होऊ न इच्छिणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात शिकवल्या जाणार्या अभ्यासक्रमाविषयीचे सर्व साहित्य पुरवावे.
३. संबंधित शिक्षण संस्थेने ‘वर्ग कोणत्या स्वरूपात घ्यायचे ?’, याविषयीचा निर्णय उपलब्ध साधनसुविधा आणि प्राप्त परिस्थिती आदींच्या आधारावरून स्वत:च घ्यायचा आहे.
४. शिक्षण संस्थेने पुढील मार्गदर्शक तत्त्वे येईपर्यंत विद्यालयांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम आणि सार्वजनिक प्रार्थना घेऊ नये.
५. वर्गांचे वेळापत्रक सिद्ध करतांना शाळेत गर्दी होणार नाही, हे पहावे. शाळेचे व्यवस्थापन आवश्यकता भासल्यास, साधनसुविधा असल्यास आणि परिस्थिती अनुरूप दोन पाळ्यांमध्ये वर्ग भरवू शकतात.
६. आजारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांनी संबंधित आधुनिक वैद्यांचा सल्ला घ्यावा.
७. शाळेतील शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या असल्या पाहिजेत अन्यथा त्यांनी कोरोनाचा संसर्ग न झाल्याचे प्रमाणपत्र (आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी प्रमाणपत्र) शाळेला द्यावे लागणार आहे.
८. कोरोनाची लक्षणे दिसत असलेले विद्यार्थी आणि इतर कर्मचारी यांनी शाळेत येऊ नये.