राज्यातील पोलीस निवासस्थानासाठी ८०० कोटी रुपयांची तरतूद ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री
कोल्हापूर, १५ ऑक्टोबर – राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानासाठी आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातून अग्रक्रमाने ग्रामीण आणि डोंगरी भागांतील पोलीस ठाणे अन् निवासस्थाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव आला असेल, तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून विचार करू, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
१. श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात सुरक्षा व्यवस्था असलीच पाहिजे; मात्र त्याची कार्यवाही करतांना नियमांचा अतिरेक करण्याची आवश्यकता नाही. असा अतिरेक करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘ई-पास’ विना दर्शनासाठी भाविकांना मंदिरात सोडणार्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे, असे आम्हाला माध्यमांद्वारे समजले आहे. त्यांनी जर याविषयी काही लेखी तक्रार केली असेल, तर त्याचे नक्की अन्वेषण केले जाईल. त्यांच्याकडे जर त्याविषयी काही पुरावा असेल, तर आमच्या यंत्रणांकडे द्यावा.
शंभूराज देसाई यांनी एक दिवस अगोदर ‘ऑनलाईन नोंदणी’ करून सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच रांगेतून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. |