नागपूर येथे कोरोना संसर्गाच्या काळात महिलांच्या संदर्भात गुन्हे वाढले !
या गुन्ह्यांविषयी कठोर शिक्षा हवी ! समाजातील गुन्हेगारी नष्ट करायची असेल, तर समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी करणे आवश्यक आहे, तसेच मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये येथे संस्कारवर्ग आणि सत्संग घेणे आवश्यक आहे !
नागपूर – शहरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या काळात कठोर दळणवळणबंदी आणि निर्बंध यांमुळे नागरिक मोठ्या संख्येने घरात होते. त्यानंतरही या काळात उपराजधानीत महिला तस्करी, बलात्कार आणि बाललैंगिक शोषण या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून पुढे आणली आहे.
शहरात कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये चालू झाली होती. त्यानंतर प्रथम काही मास कठोर दळणवळणबंदी होती. त्यानंतर हळूहळू दळणवळणबंदी शिथिल होत असली, तरी कठोर निर्बंध होते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नागरिक अल्प संख्येत घराबाहेर होते. त्यानंतरही शहरात वर्ष २०१९ या वर्षाच्या तुलनेत कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण असलेल्या २०२० आणि २०२१ ऑगस्ट मासांपर्यंत महिला तस्करी, बलात्कार आणि बाललैंगिक गुन्ह्ये यांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये उपराजधानीत महिला तस्करीचे १८, बलात्काराचे १३६ आणि बाललैंगिक अत्याचार ‘पोक्सो’चे २०० गुन्हे नोंद होते. वर्ष २०२० मध्ये त्यात वाढ होऊन ३३ महिला तस्करी, १७२ बलात्कार आणि २३८ ‘पोक्सो’चे गुन्हे नोंदवले गेले आहेत.