रामनाथी (फोंडा) येथील श्री रामनाथ देवस्थानात सीमोल्लंघन आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !
रामनाथी (फोंडा) – येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी (१५ ऑक्टोबरला) सीमोल्लंघन आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी सीमोल्लंघनाचे प्रतीक म्हणून देवालयानजीक असलेल्या डोंगरावरील शमीच्या पेडापर्यंत (पारापर्यंत) श्री रामनाथ मंदिर परिसरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील शाळीग्रामाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ब्रह्मवृंदाने शमीच्या वृक्षाचे, तसेच शस्त्रांचे पूजन करून सर्व भाविकांसाठी शुभसंकल्प केला. त्यानंतर सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला. हे सर्व विधी सामाजिक अंतर राखून आणि कोरोनाविषयक सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून करण्यात आले. यंदा कोरोना महामारीमुळे श्री देव रामनाथ आणि श्री कामाक्षीदेवी यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली नाही.
रामनाथी येथील श्री रामनाथदेव, श्री गणपति, श्री सातेरीदेवी, श्री कामाक्षीदेवी आणि कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी यांच्या चरणी सनातनच्या वतीने प्रार्थना !
रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधक श्री. सुरेंद्र आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया आठवले यांनी रामनाथी येथील श्री रामनाथदेव, श्री गणपति, श्री सातेरीदेवी, श्री कामाक्षीदेवी आणि कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी यांचे दर्शन घेतले. या वेळी सौ. सुप्रिया आठवले यांनी देवींची ओटी भरली. या वेळी उभयतांनी सनातनच्या राष्ट्र अन् धर्म कार्यासाठी, तसेच ‘आगामी आपत्काळात साधकांचे रक्षण व्हावे आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी सर्व देवतांच्या चरणी प्रार्थना करून आशीर्वाद घेतले.