रायपूर (छत्तीसगड) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. जयमीत दीपेश परमार (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. जयमीत दीपेश परमार हा एक आहे !
आश्विन शुक्ल पक्ष दशमी (विजयादशमी, १५.१०.२०२१) या दिवशी कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
सौ. हीना दीपेश परमार (आई), रायपूर, छत्तीसगड.
१. ‘कु. जयमीत प्रत्येक कृती तत्परतेने करतो.
२. समंजस
अ. जयमीत महागड्या वस्तू विकत घेण्यासाठी हट्ट करत नाही. त्याला एखादी गोष्ट हवी असतांना त्याला प्रेमाने समजावून सांगितल्यास तो लगेच ऐकतो.
आ. कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीत जयमीतने बाहेर जाण्याचा हट्ट केला नाही.
३. शिकण्याची वृत्ती
मी गणेशोत्सवाच्या काळात प्रतिदिन सायंकाळी गणपति अथर्वशीर्षाचे पठण करत होते. मी गणपति अथर्वशीर्ष म्हणत असतांना जयमीत ते ऐकायचा. नंतर ५ – ६ दिवसांनी तो मला म्हणाला, ‘‘मलाही ते म्हणायचे आहे.’’ नंतर दुसर्या दिवसापासून त्याने ते पुस्तकात पाहून म्हणण्याचा प्रयत्न केला.
४. आईला घरकामात साहाय्य करणे
तो ‘केर काढणे, पाणी भरणे, जेवतांना ताट-वाट्या घेणे, भांडी घासणे, धान्य निवडायला साहाय्य करणे, झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे’ इत्यादी कामे आवडीने करतो. ‘आजी बाजारात सामान घ्यायला जाणार’, हे कळल्यावर ‘सामानाच्या सूचीत काही राहिले नाही ना ?’, याची तो निश्चिती करतो.
५. तो मला प्रतिदिन त्याला टिळा लावून देण्याची आठवण करतो.
६. साधनेची आवड
तो ‘गणपतिस्तोत्र’ आणि ‘हनुमान चालीसा’ म्हणतो. तो स्वभावदोष-निर्मूलनासाठी स्वयंसूचना सत्रे करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी क्षमायाचना करतो.
७. नामजपादी उपाय करणे
तो प्रतिदिन वहीत नामजप लिहितो आणि थोडा वेळ बसून नामजप करतो. तो अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतो, तसेच मोरपिसाने स्वतःभोवतालचे त्रासदायक आवरण काढतो. तो रात्री झोपतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ उशीखाली ठेवतो. त्याला विभूती लावायला आवडते.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीची श्रद्धा आणि भाव
अ. ऑगस्ट २०१९ मध्ये जयमीतला ताप आला होता. तेव्हा तो स्वतःहून नामजप करायचा. तो ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ जवळ घेऊन झोपायचा. या ग्रंथातील प.पू. गुरुदेवांची छायाचित्रे बघून तो मला त्यांविषयी माहिती विचारायचा.
आ. मार्च २०२० मध्ये मी रुग्णाईत असतांना तो मला सतत नामजप करायला सांगायचा. तो परात्पर गुरु डॉक्टरांना ‘माझ्या आईला लवकर बरे करा’, अशी प्रार्थना करायचा.
९. ‘येणार्या आपत्काळात गॅस मिळणार नाही. त्यामुळे चूल सिद्ध करून ठेवूया. लाकडेही गोळा करून ठेवूया’, असे तो म्हणत असतो.
१०. अनुभूती
स्वप्नात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होणे : वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत जयमीतने सांगितले, ‘‘माझ्या स्वप्नात प.पू. डॉक्टरबाबा आले होते. त्यांनी मला सफरचंद भरवले आणि ‘चॉकलेट’ही दिले.’’ (२२.९.२०२१)
श्री. दीपेश परमार (जयमीतचे वडील), रायपूर, छत्तीसगड.
१. ‘जयमीतला नेहमी नवीन काहीतरी शिकायला आवडते.
२. तो जे काम हातात घेतो, ते मन लावून पूर्ण करतो.’
(२२.९.२०२१)
स्वभावदोष
‘राग येणे, ऐकण्याची वृत्ती नसणे, मोठ्याने बोलणे आणि ‘मला सर्व येते’, असे वाटणे
‘हे गुरुराया, ‘जयमीतला सतत तुमच्या कृपाछत्राखाली ठेवून त्याची साधना करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’ – सौ. हीना दीपेश परमार (आई), रायपूर, छत्तीसगड. (२२.९.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |