गोवा १० वर्षांनंतर सर्वाधिक ‘फॉरेन्सिक सायन्स’ (न्यायवैद्यक) शास्त्रज्ञ निर्माण करणारे केंद्र बनेल ! – अमित शहा
धारबांदोडा येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक) विद्यापिठाशी संलग्न महाविद्यालयाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पायाभरणी
पणजी, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – गोवा १० वर्षांनंतर सर्वाधिक फॉरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक) शास्त्रज्ञ निर्माण करणारे केंद्र बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. धारबांदोडा येथे नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापिठाशी (एन्.एफ्.एस्.यू.) संलग्न महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे गोवा हा अधिकाधिक खलाशी निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे हे राज्य अधिकाधिक न्यायवैद्यक शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक निर्माण करण्यासाठी प्रसिद्ध होईल. हे शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी साहाय्य करतील. या विद्यापिठात पर्यटन, अमली पदार्थ, कोस्टल पोलिसिंग यासंबंधी अभ्यासक्रम चालू करण्यात येतील.’’
आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या सर्वांगीण विकासाविषयी कौतुक केले. गोव्यातील राजकीय स्थिरतेमुळे ते शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शैक्षणिक केंद्र (हब) आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प असणारे राज्य अशी गोव्याची प्रतिमा निर्माण केली; कारण गोव्यात नॅशनल सेंटर फॉर अँटार्टिक अँड ओशन रिसर्च (राष्ट्रीय दक्षिण ध्रूव आणि महासागर संशोधन केंद्र), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुष (राष्ट्रीय आयुष संस्था), गोवा व्यवस्थापन संस्था, आय.आय.टी. (भारतीय तंत्रज्ञान संस्था), एन्.आय.टी. (राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) अशा राष्ट्रीय स्तरावरील अनेक संस्था आहेत. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याला स्वतःचे असे विशेष स्थान प्राप्त करून दिले. सैन्याच्या तिन्ही दलांतील कर्मचार्यांसाठी ‘एक श्रेणी एक निवृत्तीवेतन’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ या दोन गोष्टींसाठी मनोहर पर्रीकर सर्व देशवासियांच्या लक्षात रहातील.’’