साधू-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।
‘दिवाळी हा आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. संतांनी दिवाळीच्या आनंदाची तुलना आपल्या आत्मिक आणि आध्यात्मिक आनंदाशी केलेली आहे.
१. संत ज्ञानेश्वर
‘मी अविवेकाची काजळी । फेडुनि विवेकदीप उजळी ।
तै योगिया पाहे दिवाळी । निरंतर ।।’ – ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी ५४
‘सूर्ये अधिष्ठिली प्राची ।
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची ।
दिवाळी करी ।।’ – ज्ञानेश्वरी, अध्याय १५, ओवी १२
२. संत नामदेव
अ. ‘विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपावली ।
विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी ।।’
आ. ‘नामयाची धणी भुकेली ते धाली । आनंद दिवाळी आजि झाली ।।’
इ. ‘सण दिवाळीचा आला । नामा राऊळासी गेला ।’
३. संत चोखामेळा
‘धन्य ते सभाग्य नर आणि नारी ।
करिताती वारी पंढरीची ।।
तयांचे चरण माझे दंडवत ।
जे नेमे माझ्या गात विठोबासी ।।
दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ ।
नांदती सकळ तया घरी ।।’
४. संत तुकाराम
‘तुका म्हणे (संत) आले घरा ।
तोचि दिवाळी-दसरा ।’
दुसर्या एका अभंगात ते म्हणतात, ‘दसरा दिवाळी तोचि आम्हा सण ।
सखे संतजन भेटतील ।।’
५. संत एकनाथ
‘आजी दिवाळी दसरा । आलो विठ्ठलाच्या द्वारा ।।’
६. संत सेना न्हावी
‘आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे संत आले घरा ।।’
– (संदर्भ : आदिमाता दीपावली विशेषांक २०११)