विजयादशमीचे महत्त्व !
१. विजयादशमी
‘या दिवशी प्रभु श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला. ‘वाईट प्रवृत्तीवर सत् प्रवृत्ती विजय मिळवते’, ही गोष्ट दर्शवणारा हा दिवस आहे. विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांनी या दिवशी घराबाहेर पडून विजयश्री खेचून आणली होती.
२. जम्बुद्रीपात
भारतवर्षात तीन ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पावसाळा नुकताच संपला असून शेतीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतात पिके डोलू लागलेली आहेत. कुलाचार संपलेले असतात. त्यातून बाहेर पडून कर्तृत्व गाजवण्यासाठी मन अधीर झालेले असते. या दिवशी अनेकांनी विजय संपादन केले. यामुळे विजयाचा पायंडा असलेल्या या दिवसाची गणना साडेतीन मुहूर्तांत केली जाऊ लागली.
२ अ. पांडवांनी १ वर्ष अज्ञातवासात घालवल्यानंतर युद्धभूमीवर जाऊन विराट राजाला जय मिळवून दिला, तो दिवस म्हणजे विजयादशमी ! : पांडवांचा १२ वर्षांचा वनवास संपल्यानंतर त्यांना १ वर्ष अज्ञातवासात काढायचे होते. त्यांनी आपली शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवली आणि आपली वस्त्रे पालटून ते विराट राजाच्या दरबारी विविध रूपे घेऊन राहू लागले. अर्जुन ‘बृहन्नडा’ (नर्तकी) बनून नृत्यागारात राहू लागला. या कालावधीतील अनेक संकटांचे कौशल्याने निवारण करण्यात आले. वर्ष संपतांना विराट राजावर परचक्र आले. राजा वृद्ध, तर राजपुत्र बिनकामाचा, अशा परिस्थितीत अज्ञातवासाची मुदत संपताच आश्विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी शस्त्रे बाहेर काढून आणि त्यांची पूजा करून पांडव युद्धभूमीवर आले. त्यांनी विराट राजाला या दिवशी जय मिळवून दिला; म्हणून दसर्याला शस्त्रपूजा आणि शमीपूजा करण्याची प्रथा आहे.
२ आ. कौटुंबिक आनंद वाढवण्याचा सण ! : या दिवशी आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून दिली जातात. ‘सोने घ्या, सोन्यासारखे वागा, सोन्यासारखे रहा’, अशा शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या जातात.’
– श्री. चिंतामणी देशपांडे (गुरुजी) (संदर्भ : मासिक ‘शिवमार्ग’, दसरा २०१६)