प्रशासनाने हानीभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कळणे ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
जुलै मासात खनिजयुक्त पाणी घरे आणि बागायती यांमध्ये घुसून झाली होती हानी
प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?
सावंतवाडी – कळणे येथील खाण प्रकल्पाचा बंधारा जुलै मासात झालेल्या अतीवृष्टीत फुटून खाणीतील खनिजयुक्त पाणी येथील घरे आणि बागायती यांमध्ये घुसले होते. या वेळी झालेल्या हानीची भरपाई मिळावी, यासाठी कळणे ग्रामस्थांनी १३ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन चालू केले. त्यानंतर प्रशासनाने ३१ ऑक्टोबरपर्यंत हानीभरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या वेळी मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास लोकायुक्तांकडे आणि न्यायालयात याविषयी न्याय मागू’, अशी चेतावणी प्रशासनाला दिली.
कळणे येथील खाण प्रकल्पाची माती घुसून हानी झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले; मात्र घटना घडून ४ मासांनंतरही हानीभरपाई न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरे घेऊन प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू केले होते. या वेळी शेतकर्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही, अशी चेतावणी माजी आमदार उपरकर यांनी दिली.
या वेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेलकर, दोडामार्गचे तहसीलदार अरुण खानोलकर आणि खनिकर्म विभागाचे (खाणींविषयी कारभार पहाणारा विभाग) अधिकारी अजित पाटील यांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी ‘३१ ऑक्टोबरपर्यंत हानीभरपाई दिली जाईल’, असे आश्वासन दिले. या वेळी मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.