माजी खासदार नीलेश राणे यांच्या पराभवाची ‘हॅट्रीक’ करण्यासाठी शिवसैनिक सज्ज ! – हरि खोबरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख, मालवण
मालवण – माजी खासदार नीलेश राणे यांनी आगामी निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात उभे रहायचे, ते ठरवावे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसैनिक, तसेच खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची ‘हॅट्रीक’ (सलक तिसर्यांदा विजयी होणे) करतील, तर तुमच्या पराभवाची हॅट्रीक करतील, अशी चेतावणी शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य हरि खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांची अनामत रक्कम (डिपॉझिट) येत्या निवडणुकीत जप्त होईल, असा पराभव करू’, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राणे यांना प्रत्त्युत्तर दिले. या वेळी खोबरेकर म्हणाले, ‘‘आमदार नाईक यांची अनामत रक्कम जप्त करू’, असे म्हणणार्या राणे यांनी ‘ते कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे रहाणार’ ते प्रथम ठरवावे. कारण येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत अनुक्रमे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या विजयाची ‘हॅट्रीक’ करण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. कुडाळमधील शिवसेनेच्या काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावरून राणे यांनी शिवसेनेला आव्हान देऊ नये. राणे यांनी भविष्यात केवळ निवडून येण्याची स्वप्ने पहावीत.’’
भाजपचे माजी खासदार राणे यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सलग २ वेळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पराभव केला आहे. या पार्श्वभूमीवर खोबरेकर यांनी ‘आगामी निवडणुकीत राणे यांच्या पराभवाची ‘हॅट्रीक’ करू’, अशी चेतावणी दिली आहे.