वापी (गुजरात) येथील श्री. विजय पाटील यांना वर्ष २०२० मधील नवरात्रीच्या कालावधीत जगदंबेने कृपा केल्याविषयी आलेल्या अनुभूती

श्री. विजय पाटील

१. नवरात्रीतील ९ दिवस पहाटे लवकर जाग येऊन ‘ऑनलाईन’ नामजपासाठी बसता येणे

‘वर्ष २०२० मधील नवरात्रीच्या कालावधीत मला प्रतिदिन पहाटे ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास जाग येत असे. त्या वेळी माझी झोप पूर्ण झालेली असे आणि त्यानंतर मला आळस येत नसे. त्यामुळे मला ९ दिवस प्रतिदिन पहाटे ५.३० वाजता ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपासाठी बसता आले. असे मी प्रथमच अनुभवत होतो. या पूर्वी मला कधीच पहाटे ४.३० वाजता उठायला जमले नाही.

२. देवघरातील श्री कालिकामातेची ओटी भरल्यावर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ओटी भरूया’, असे वाटून भाव जागृत होणे

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आम्ही देवघरातील कुलदेवी श्री कालिकामाता हिच्या चित्रासमोर साडी आणि नारळ अर्पण करून तिची ओटी भरली अन् देवीला भावपूर्ण प्रार्थना करून तिची आरती केली. त्या वेळी ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची ओटी भरूया’, असे तीव्रतेने वाटून माझा भाव जागृत झाला.

३. नवरात्रीतील सर्व दिवस मला घरात चैतन्य जाणवत होते. त्या दिवसांत माझा उत्साह टिकून असायचा.

४. रात्री भाववृद्धी सत्संग चालू झाल्यावर घरातील चैतन्यात अधिक वाढ झाल्याचे मला जाणवायचे.

५. नामजप करत असतांना पांढरा प्रकाश दिसणे

एकदा मी सकाळी लवकर उठून नामजप करत होतो. घरातील सर्व जण झोपले असल्याने दिवा बंद होता. नामजप चालू असतांना काही वेळाने डोळे मिटल्यावर माझ्या डोळ्यांवर लख्ख पांढरा प्रकाश पडला. ‘पत्नीने दिवा चालू केला असेल’, असे वाटून मी डोळे उघडले, तर दिवा बंदच होता.

६. डोळे मिटून नामजप करतांना पाठीमागे सोनेरी लख्ख प्रकाश पडल्याचे जाणवणे

एकदा सायंकाळी मी आसंदीवर बसून डोळे मिटून नामजप करतांना मला ‘माझ्या डाव्या बाजूने पाठीमागून सोनेरी लख्ख प्रकाश पडला आहे’, असे जाणवले. मी घाबरून बाजूला झालो. त्या वेळी आपण अंधारात असतांना एकदम कुणीतरी दुचाकी चालू केल्यावर जसा दिव्याचा प्रकाश पडतो, तसे मला वाटले.

७. सत्संग ऐकतांना अकस्मात् एक गोंडस लहान मुलगी रांगत येत असल्याचे जाणवणे आणि त्यानंतर ती कुठेही न दिसणे

एकदा मी पलंगाजवळ बसून भाववृद्धी सत्संग ऐकत होतो. भ्रमणभाषवरील देवीचे चित्र बघत मी सत्संग ऐकत होतो. तेव्हा मला जाणवले, ‘पलंगावरून एक  गोंडस लहान मुलगी रांगत रांगत माझ्या बाजूने आली आणि ती माझ्या हातातील भ्रमणभाषमधील देवीचे चित्र पहात होती.’ ‘घरात तर मुलगी नाही. मग ही लहान मुलगी कोण ?’, असा विचार येऊन मी पलंगाकडे बघितले, तर तेथे कुणीच नव्हते. या घटनेचा मला अर्थ समजला नाही. (‘साधकाच्या मनातील भावाप्रमाणे देव त्याला अनुभूती देतो. या प्रसंगात साधकाच्या मनात निर्मळता असल्याने देवीने त्याला बालिकेच्या रूपात दर्शन दिले.’ – संकलक)

८. एकदा भाववृद्धी सत्संग ऐकत असतांना संध्याकाळी सूर्य मावळतीला आल्यावर जसा प्रकाश दिसतो, तसा सोनेरी प्रकाश मला खोलीत दिसला.

आई जगदंबेने माझी पात्रता नसतांना माझ्यावर पुष्कळ कृपा केली असल्याचे मला जाणवले. आयुष्यात प्रथमच मी आई भवानीची शक्ती अनुभवत होतो. ‘परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याच कृपेमुळे मला हे अनुभवता आले’, याकरता मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. विजय पाटील, वापी, गुजरात. (१५.१.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक