कोळसा शिल्लक नसल्याने महाराष्ट्रात भारनियमन होण्याची शक्यता !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – देशातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता २ दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. परिणामी १० सहस्र २२२ मेगावॅट विजेच्या उत्पादन क्षमेच्या तुलनेत केवळ ५ सहस्र ५३८ इतकेच उत्पादन होत आहे. दुसरीकडे महावितरण विभागाच्या वतीने नागरिकांना सकाळी आणि सायंकाळी विजेची बचत करण्याचे आवाहन करून भारनियमन चालू होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

राज्यभरातील वीज केंद्रांत जवळपास २० दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असतो. पावसाळ्यात हा साठा ५ ते ७ दिवसांपर्यंत येतो; मात्र यंदा यापेक्षाही अल्प झाला आहे. ३ दिवसांपेक्षा अल्प कोळशाचा साठा असेल, तर त्याला अतीसंवेदनशील परिस्थिती मानली जाते. वीज केंद्रांसाठी ही धोक्याची घंटा असते. अशा स्थितीत कोळसा पुरवठा होण्यास थोडीही अडचण आली, तर वीज केंद्र बंद पडू शकते.

महाजेनकोचे म्हणणे आहे की, यंदा चांगला पाऊस झाला आहे. खुल्या खदाणींमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे कोळशांचे उत्पादन प्रभावित झाले आहे. परिणामी कोळशाचा पुरवठा होत नाही. सध्या चंद्रपूरमध्ये सर्वाधिक १.६४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोरोडी, नाशिक, भुसावळ आणि खापरखेडा येथे १ दिवस आणि इतर वीज केंद्रांत त्यापेक्षाही अल्प दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. खासगी वीज केंद्रातील परिस्थितीतही सारखीच आहे. अशा परिस्थितीत अनेक वीज संच बंद पडले आहेत.