पाकिस्तान्यांकडून मुंबई पोलिसांचा ई-मेल ‘हॅक’ !

संरक्षणव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पाकिस्तानच्या ‘हॅकर्स’नी ps.mummahapolice.gov हा मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाचा ई-मेल ‘हॅक’ करून (नियंत्रण मिळवून) त्या आयडीवरून सर्व शासकीय ई-मेल आयडीवर एक ‘फिशिंग’ ई-मेल पाठवला आहे. त्यामध्ये ‘रिपोर्ट इंटेलिजन्स डॉट पी.डी.एफ्.’ नावाची धारिका दिसत आहे. हॅकर्सनी अन्य ई-मेल हॅक करण्यासाठी असे ई-मेल केले आहेत. सायबर विभागाचाच ‘ई-मेल आयडी’ हॅक झाल्याने खळबळ उडाली आहे. (‘फिशिंग’ ई-मेल हा प्रकार म्हणजे अधिकृत आस्थापन अथवा सरकारी विभाग यांच्याकडून ई-मेल पाठवण्यात आल्याचे भासवून तो उघडल्यास संबंधितांची महत्त्वपूर्ण माहिती उदा. पासवर्ड आदी चोरी केले जाणे.)

हा मेल अन्य शासकीय खात्यांसमवेतच नागरिकांनाही पाठवण्याची शक्यता आहे. या माध्यमातून भारतियांची माहिती मिळवण्याचा पाकिस्तान्यांचा प्रयत्न आहे. हा मेल उघडल्यास हॅकर्सना संबंधित ई-मेल आणि यंत्रणा यांचा ‘पासवर्ड’ मिळतो. ही माहिती घेऊन हॅकर्स त्याचा दुरुपयोग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘राजेश शिवाजीराव नागवडे याच्या नावाने आलेला मुंबई पोलिसांचा ई-मेल आणि त्यातील ‘पी.डी.एफ्.’ धारिका उघडू नका’, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने केले आहे.

याविषयी महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधिकारी संजय शिंत्रे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, राज्याच्या सायबर सेलने या प्रकरणाची गंभीर नोंद घेतली आहे.