दसरा सण, त्याचे महत्त्व आणि अज्ञानी पर्यावरणवादी !

१५ ऑक्टोबर २०२१ या दिवशी ‘विजयादशमी (दसरा)’ आहे. त्या निमित्ताने…

केवळ हिंदु सण आणि धर्म यांना विरोध करणार्‍या पर्यावरणवाद्यांचे खरे स्वरूप ओळखा ! – संपादक 

सण आणि उत्सव यांचा ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) करू नका !

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २१

अर्थ : श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच अन्य लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो.

सामान्य लोकांच्या या मानसिकतेचा विचार करूनच आपल्याकडे सणांची रचना केली आहे. विजयादशमी हा लोकोत्तर पुरुषांचा किंवा देवांचा विजयी पराक्रम स्मरून त्याचे अनुकरण करण्याचा दिवस ! ९ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर विजयादशमीला श्री दुर्गादेवीने महिषासुरावर विजय मिळवला. प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा पराभव याच दिवशी केला. अज्ञातवासानंतर पांडवांनी शमी वृक्षावरून त्यांची शस्त्रे काढली, तो हाच दिवस ! भारतीय संस्कृती ही मानवतेची आणि शौर्याची पूजक आहे. मानवतेचा नाश करू पहाणार्‍या आसुरी वृत्तीची नव्हे ! राक्षसी वृत्तींपासून मानवाचे आणि मानवतेचे रक्षण करायचे असेल, तर व्यक्ती-व्यक्तीत शौर्य, वीरता, पराक्रम जागले पाहिजेत. नवरात्राचा जागर हा त्यासाठीच असतो. या शौर्याचा उत-मात येऊ नये; म्हणून त्याला देवीच्या भक्तीची आणि वात्सल्याची जोड दिली आहे. तथापि आज हा हेतू विसरून आपल्या सर्वच उत्सवांचे आपण ‘इव्हेंट्स’ (कार्यक्रम) करू लागलो आहोत. त्यात शौर्य-धैर्याचा मूळ हेतू हरवला जातो आहे. सध्या केवळ नाच, गाणी आणि गरबा यातच आम्ही रमून आणि दमून गेलो आहोत ! भगवंताची गाणी गाणे, नृत्य करणे, मोठ्याने त्याच्या नावाचा गजर करणे, हे सर्व मान्य आहे; पण देहभान हरपून भक्तीत तल्लीन झाल्यावरच ! हिडीस नाच, मोठ्या कर्कश आवाजात डीजे लावून आणि अपेयपान करून नव्हे !

व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात वीरता प्रगट करणारा उत्सव !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

दसरा सण हा पावसाळा संपून सुगीचे दिवस प्रारंभ होण्याचा काळ आला आहे, याची चाहूल देतो. ऋतू पालटतो. भक्ती आणि शक्ती जागृत करायला हवी अन् व्यक्ती आणि समाज यांच्या रक्तात वीरता प्रकटावी, म्हणून हा उत्सव आहे. शत्रू सातत्याने कुरापती काढत असेल आणि युद्धाला पर्याय नसेल, तर शत्रूच्या पुढाकाराची वाट न बघता आपणच शत्रूवर आधी आक्रमण करणे, ही कुशल राजनीती होय. त्यासाठी शस्त्रांचे पूजन आणि त्यांना धार लावून सीमांचे उल्लंघन करत विजय मिळवण्याच्या निश्चयाने शत्रूला भिडणे म्हणजे विजयादशमी होय ! रोग आणि शत्रू उत्पन्न होताच त्यांचा नायनाट केला पाहिजे. एकदा त्यांनी आपले हातपाय पसरले, तर ते खूप हानी करतात आणि त्यांना आवरणेही कठीण जाते. अर्थात् यासाठी सावधानता आणि दक्षता हे दोन गुण आवश्यक आहेत. बेसावध सावज हे सहज शिकार बनू शकते. आक्रमण झाल्यावर शस्त्रे शोधत बसण्याची वेळ आली, तर पराभव निश्चितच होणार.

दसरा म्हणजे १० मानसिक रिपूंवर विजय मिळवण्याची संधी !

सामान्य माणसासाठी दसरा म्हणजे स्वत:च्या १० मानसिक रिपूंवर विजय मिळवण्याची संधी. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ, अन्याय, क्रौर्य आणि अहंकार हे १० रिपू होत. कुटुंब आणि समाज यांच्या भल्यासाठी त्यांचे निर्दालन करणे उपयुक्त आहेच; पण चारित्र्य, प्रतिष्ठा, मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांच्या रूपाने या विजयाचा सर्वांत अधिक लाभ मिळतो तो त्या व्यक्तीलाच ! आपल्या दुर्गुणांच्या सीमांचे उल्लंघन करून दैवी गुण प्राप्त करण्यासाठी कटीबद्ध होण्यासाठी विजयादशमी इतका उत्तम मुहूर्त नाही.

दानाचे महत्त्व शिकवणारा दसरा !

आपल्या सर्व सणावारांत आपल्याला देण्यात येणारी आणखी एक मोठी शिकवण म्हणजे दान ! कलियुगातील गुन्हेगारीपासून ते प्रदूषणापर्यंत सगळ्या समस्यांचे कारण माणसाच्या लोभी आणि संग्रही वृत्तीत दडले आहे. ‘दान’ हा त्यावर उत्तम उतारा आहे. रघु राजाच्या सांगण्यानुसार कुबेराने आपट्याच्या झाडावर मोहोरांचा पाऊस पाडला, तरी कौत्साने त्याच्या आवश्यकतेइतक्या म्हणजे केवळ १४ कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या. त्या आपल्या गुरूंना म्हणजे वरतंतू ऋषींना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. दरिद्री असूनही स्वतःसाठी एकही सुवर्णमुद्रा त्याने घेतली नाही. ‘बाकीच्या मुद्रा लोकांनी घेऊन जाव्यात’, असे त्याने सांगितले. तेव्हापासून आपण दसर्‍याला आपट्याची पाने एकमेकांना ‘सोने’ म्हणून देतो. खरेतर ‘सोने लुटणे’ यातील अभिप्रेत अर्थ ‘आपल्या आवश्यकतेपेक्षा आपल्याकडे असलेले अधिकचे धन, गरजू आणि दरिद्री लोकांना दान देणे’ असा आहे.

युध्यन्ते पशव: सर्वे पठन्ति शुकसारिका: ।
दातुं जानाति यो वित्तं स शूर: स च पण्डित:।।

अर्थ : सर्व प्राणी युद्ध करतात (याला शौर्य म्हणत नाहीत.) पोपट आणि मैना पठण करतात (यात पांडित्य नाही.) जो संपत्ति दान करणे जाणतो, तोच शूर आणि तोच पंडित होय.

प्रत्येक सणामागील आध्यात्मिक हेतू लक्षात घ्या !

दीपावलीच्या तोंडावरच विजयादशमी येते. आपल्या प्रत्येक सणामागे काही हेतू आणि त्यात संदेश आहे. आपण तो विसरत चाललो आहोत. यामुळे हानी आपलीच होणार आहे, हे ध्यानात घ्यायला नको का ? परब्रह्म अथवा परमात्मा हा सगुण साकारात दिसणारा नव्हे. तो कळण्यासाठी आत्मसाक्षात्काराचा दिव्यानुभवच हवा. एखादा अप्रतिम सूर ऐकतांना आपण जशी तल्लीनता अनुभवतो, तसेच काहीसे आत्मसाक्षात्कारात होते. आपण उपासनेसाठी मूर्तीपूजा स्वीकारली आहे. ज्या समाजात मूर्तीपूजा नाही, ते सदैव अस्वस्थच असलेले दिसतात. मूर्तीमुळे आपण निर्गुण निराकाराला सगुण साकारात बघतो. हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे की, आपण मूर्तीपूजेत अडकत नाही; कारण ही पूजा परब्रह्माची आहे, याची आपल्याला शिकवण असते. मूर्ती कितीही असल्या, तरी ‘सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।’ म्हणजे ‘कुठल्याही देवाला नमस्कार केल्यास अंततः तो भगवान श्रीकृष्णालाच पोचतो’, हे आपल्याला ठाऊक असायला हवे. त्याला जे अर्पण करतो, ते खरेतर त्याचेच असते. मी अमके दिले, तमके द्रव्य दिले, हा अहंकार कशाला ? तो ईश्वरार्पण केला की झाले ! हे समजून घ्यायला हवे. मीपणा सोडून ईश्वराला शरण जाणे, हीच खरी पूजा आहे.

अन्य धर्मियांसमोर शेपूट घालणारे पर्यावरणवादी !

दसरा आला की, आपट्याची पाने तोडल्यामुळे निसर्गाचा र्‍हास कसा होतो आहे, अशा शहाणपणाच्या गोष्टी शिकवायला अनेक स्वघोषित ज्ञानी पुढे सरसावतात. यांना केवळ हिंदूंमधील अशा गोष्टी दिसतात आणि लगेच चोची मारायला चालू करता येते. हेच अन्य धर्मियांच्या वेळी मूग गिळून गप्प बसणे, म्हणजे यांचा सोयीस्कर ‘सेक्युलरपणा’ असतो. कधी कधी असे वाटते की, हेच खरे (?) हिंदुत्वनिष्ठ आहेत; कारण यांना केवळ हिंदूंनाच सुधारायचे आहे. मग अन्य धर्मीय असलेले आमचे बांधव अज्ञानात खितपत पडले, तरी त्याचे यांना काहीच वाटत नाही ! अर्थात् तिथे मार खाण्याची अथवा जीव जाण्याचीसुद्धा भीती असते, हे दुसरे उघड गुपित आहे.  ‘इमारती, फर्निचर, कागद आदी अनेक कामांसाठी भरमसाठ जंगलतोड होते, त्याचे काय ?’, असे प्रश्न यांना विचारण्याचा उपयोग नसतो; कारण तिथे यांचे चार शहाणपणाचे बोल कुणी ऐकण्याच्या स्थितीत नसतात.

‘प्रतिवर्षी आपटा तोडून त्याची झाडे अल्प झाल्यामुळे यावर्षी ती मिळणार नाहीत’, असे कुणी ऐकले आहे का ? ‘मी आपट्याचे झाड लावीन’, असा संकल्प केला, तर पाने मुबलक उपलब्ध होतील; पण असे सुचवण्यापेक्षा ‘मी पानेच देणार नाही’, हे म्हणणे खुळचटपणाचे आहे, असे वाटत नाही का ?

धार्मिक महत्त्वामुळे टिकून असलेले वृक्ष आणि पर्यावरण !

पर्यावरणाच्या काळजीपोटी बोलणारे नेहमीप्रमाणे आपला सण आणि संस्कृती यांवर एक छुपे आक्रमण करत असल्याचे स्पष्ट जाणवते. ‘म्हणे, हे झाड पाने तोडल्यामुळे नष्ट होईल.’ सहस्रो वर्षांपासून आपट्याची पाने वाटली जातात, मग हे झाड अजूनपर्यंत का नष्ट झाले नाही ? जरा विचार करा. या झाडाला जी फुले आणि फळे येतात, त्यांचा व्यवहारात काहीच उपयोग नाही. त्या हिशोबाने हे झाड तर सहस्रो वर्षांपूर्वीच नष्ट व्हायला हवे होते; पण ते टिकून आहे, ते केवळ दसर्‍याच्या सणामुळे. या झाडाचे पर्यावरणातील महत्त्व, तसेच आयुर्वेदानुसार औषधी गुण जाणून हे झाड टिकावे म्हणूनच आमच्या पूर्वजांनी याला सणांशी जोडले आहे. ज्या वृक्षांचे आपला कोणताच सण अथवा देवता यांच्याशी संबंध नाही, असे भारतातील सहस्रो वृक्ष आज नष्ट झाले आहेत. आज वड, पिंपळ, उंबर ही झाडे केवळ देवांशी संबंध जोडलेला आहे म्हणून टिकून आहेत, अन्यथा ती कधीच नष्ट झाली असती. अशा झाडांची लागवड जाणीवपूर्वक कुणीच करत नाही; कारण त्याचा कोणताच आर्थिक लाभ नसतो; पण देवाधर्माशी जोडले गेले असल्याने स्वतःहून आलेली झाडे मात्र कुणीच तोडत नाही. आजही प्रत्येकाच्या घरात, अगदी सदनिकेमध्येही जिथे झाडाला जागा नसेल तिथेही लोक तुळस लावतात. मग अशा चांगल्या, कुणालाच त्रास न होणार्‍या; पण उपयोगी श्रद्धा जोपासायला काय अडचण आहे ? आपला हिंदु धर्म, हिंदु संस्कृती, परंपरा या नेहमी पर्यावरणपूरकच राहिल्या आहेत.

प्रतिवर्षी दसर्‍याला आपट्याचे एक झाड लावा !

आता पाने तोडली, तरी एक-दोन मासांनी त्याला पुन्हा पालवी फुटेल; पण दसर्‍याच्या दिवशी पाने वाटण्याची पद्धत बंद केली, तर मात्र हे झाड १० ते १२ वर्षांत मात्र नक्कीच नष्ट होईल. ज्या लोकांना वाटते की, एखाद्या झाडाची पाने तोडल्यावर झाड नष्ट होईल, मुळात ते लोक आपले वनस्पती शास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट करत असतात. झाडाची जोपासना करतांना बर्‍याच वेळा झाडाची काही पाने अथवा फांद्या छाटाव्याच लागतात; त्यामुळे ते झाड नव्या जोमाने बहरते; पण या लोकांचा कोणत्याच विषयाचा अभ्यास नसल्याने आणि केवळ हिंदु सण अन् धर्म यांना विरोध करायचा असल्याने असे संदेश पसरवले जातात. पर्यावरणाची काळजी असेल, तर त्यांनी झाडे लावावीत. त्यांना कुणी अडवतही नाही; पण अशा परंपरा नष्ट करू नका. ज्या लोकांना खरोखरंच पर्यावरणाची आणि आपट्याच्या झाडाची काळजी आहे, त्यांनी या वर्षीपासून नवीन उपक्रम राबवावा अन् प्रतिवर्षी दसर्‍याला एक आपट्याचे झाड स्वतः लावावे. असा सकारात्मक विचार सर्वांनी करून आपले सणोत्सव साजरे केले, तर खरोखरंच सणांच्या आनंदाला तोटा रहाणार नाही.

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २५.१०.२०२०)