सावरकरांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरून दयेची याचिका प्रविष्ट केली होती ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी देहली – अंदमान येथील कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म. गांधी यांच्या सांगण्यावरूनच ब्रिटीश सरकारकडे दयेची याचिका प्रविष्ट केली होती, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. ते ज्येष्ठ पत्रकार उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर : दी मॅन हू कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’ (वीर सावरकर : अशी व्यक्ती जी भारताची फाळणी रोखू शकले असती) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Savarkar a strategic affairs expert, gave robust defence, diplomatic doctrine: Defence min https://t.co/wUh9OXclVE
— Republic (@republic) October 12, 2021
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की,
१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तीमत्त्वाविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी मतभेद असू शकतात; पण त्यांच्या विचारसरणीवरून त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.
२. एका विशिष्ट विचारसरणीने प्रभावित झालेला गट सावरकर यांच्या जीवन आणि विचारसरणी यांपासून अपरिचित आहे अन् त्यांना सावरकर यांची योग्य समज नाही. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात; पण सावरकर एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि महानायक होते, आहेत आणि भविष्यातही असतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्यांची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज यावरून घेता येतो की, ‘ब्रिटिशांनी त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली.’
३. काही विशिष्ट लोक सावरकर यांच्यावर ‘नाझी’ आणि ‘फॅसिस्ट’ असल्याचा आरोप करतात; ते स्वतः लेनिनवादी अन् मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजूनही आहेत. साध्या शब्दांत सांगायचे, तर सावरकर हे ‘वास्तववादी’ आणि ‘राष्ट्रवादी’ होते. (‘फॅसिस्ट’ म्हणजे वर्ष १९४० च्या दशकात इटलीचा तत्कालीन हुकूमशहा मुसोलिनी याने चालू केलेल्या आंदोलनात सहभागी होणारे)
स्वातंत्र्यवीर सावरकर मुसलमानांचे शत्रू नव्हते !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
स्वातंत्र्यवीर सावरकर हे मुसलमानांचे शत्रू नव्हते. त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिल्या आहेत. सावरकर यांच्याविषयी आजही चुकीची माहिती समाजात आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी या वेळी केली.
सरसंघचालक यांनी मांडलेली सूत्रे
१. स्वातंत्र्यापासून वीर सावरकर यांच्याविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे; मात्र आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकर यांना ओळखू शकतील. सावरकर यांच्यासारखेच स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याविषयी योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल.
२. जे भारतातील एकतेच्या विरोधात आहेत, त्यांना सावरकर आवडत नाहीत. सावरकर यांचा असा विश्वास होता की, ‘राष्ट्रीयत्व हे लोकांच्या उपासनेच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेदभाव करत नाही. हेच हिंदु राष्ट्रीयत्व आहे. येथे प्रत्येकजण समान आहे, म्हणून विशेषाधिकारांविषयी बोलू नका.’ हिंदुत्वाचे ‘सावरकर यांचे हिंदुत्व’, ‘विवेकानंद यांचे हिंदुत्व’, असे वर्णन करणे ही आता एक फॅशन (टूम) आहे. हिंदुत्व एक होते, आहे आणि शेवटपर्यंत एक राहील.