एका साधिकेला दिसलेली सूक्ष्मातील दृश्ये आणि आलेल्या अनुभूती !
१. रामनाथी आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवून ‘ते दिवस-रात्र साधकांचे रक्षण करत आहेत आणि साधकांवर आलेली संकटे तेच दूर करत आहेत’, असा विचार येणे
‘३.८.२०१९ या दिवशी रात्री मला स्वप्नात दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) काठी टेकत भोजनकक्षाच्या बाहेरील मार्गिकेत (उद्वाहन आहे तेथून) भोजनकक्षाकडे बघत चालत आहेत. त्यांनी पांढरे धोतर नेसले आहे. त्यांच्या डोक्यावर काळी टोपी असून त्यांनी हातात काठी घेतली आहे. त्यांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला.’ त्यानंतर मला जाग आल्यावर ‘मी पुष्कळ आनंदात आहे’, असे मला वाटले. ‘प.पू. भक्तराज महाराज दिवस-रात्र आम्हा साधकांचे रक्षण करत आहेत. आमच्यावर आलेली संकटे दूर करत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
२. रात्री नामजप करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !
२ अ. नामजपासाठी बसले असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्थूल देह अग्नीत जळत आहे, त्या देहाला पुष्कळ यातना होत आहेत आणि ते यातना सहन करत आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसणे : ५ आणि ६.१०.२०१९ या दिवशी रात्री ९.३० वाजता मी नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्थूलदेह अग्नीत जळत आहे. त्यांना पुष्कळ यातना होत आहेत. ते या यातना सहन करत आहेत’, असे दृश्य सूक्ष्मातून दिसले. हे दृश्य पहात असतांना मला काहीच वाटत नव्हते. तेथे अन्य व्यक्ती दिसत नव्हत्या. तेवढ्यात मला पायाला काहीतरी टोचल्यासारखे झाले. मी डोळे उघडल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझा नामजप चालू आहे.’ मी श्रीकृष्णाला विचारले, ‘आज मला असे दृश्य का दिसले ?’ त्याचे उत्तर मला मिळाले नाही.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टर सनातन धर्माचे निर्माते असून ते साधनेचा मुख्य स्रोत असणे, तो नष्ट करण्यासाठी अनिष्ट शक्ती अघोरी विद्येचा वापर करणे; मात्र ‘अघोरी विद्येपेक्षा भगवंताची शक्ती पुष्कळ मोठी असल्याने गुरुदेवांना काहीही होणार नाही’, या विचाराने मन शांत होणे : मी श्रीकृष्णाच्या प्रतिमेकडे पहात नामजप करत होते. तेव्हा माझे डोळे आपोआप बंद होऊन जप होत होता. त्यानंतर ‘मला असे दृश्य का दिसले ?’, असा विचार करत असतांनाच ‘हे श्रीकृष्णा, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळू दे. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि त्यांचे आरोग्य चांगले होऊ दे’, अशी प्रार्थना माझ्याकडून झाली. तेव्हा मनात विचार आला, ‘परात्पर गुरु डॉक्टर सनातन धर्माचे निर्माते आहेत. ते साधनेचा मुख्य स्रोत आहेत. मुख्य स्रोत नष्ट झाल्यावर अनिष्ट शक्तींचा विजय होणार आहे. भगवंता, हिंदु राष्ट्रात आणि साधनेत अघोरी विद्येचा काहीच उपयोग नाही; म्हणून अघोरी मंत्रविद्या समूळ नष्ट होऊ दे. अघोरी विद्येपेक्षा भगवंताची शक्ती पुष्कळ मोठी आहे. त्यामुळे माझ्या गुरुदेवांना, माझ्या भगवंताला काहीही होणार नाही.’ या विचाराने माझे मन शांत झाले. त्यानंतर माझ्याकडून ‘हे दुर्गादेवी, परात्पर गुरु डॉक्टरांवर आलेला महामृत्यूयोग शीघ्रातीशीघ्र दूर होऊ दे. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे’, अशी तुझ्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करते’, अशा प्रार्थना दिवसभर होत होत्या.
३. एका संतांचा लाभलेला सत्संग
३ अ. भावसत्संगात ‘संतांची कांती तेजस्वी आणि सोन्यासारखी चमकत आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि ते पाहून पुष्कळ आनंद होणे : एकदा सायंकाळी भावसत्संग होता. तेथे गेल्यावर सत्संग घेणारी साधिका भावार्चना सांगत असतांना सर्वांनी डोळे मिटले होते. त्या वेळी ‘सूक्ष्मातून मला परात्पर गुरु डॉ. आठवले आत आले आहेत’, असे जाणवले. नंतर ‘सूक्ष्मातून त्यांची कांती तेजस्वी आणि सोन्यासारखी चमकत आहे’, असे मला दिसले. ते पाहून मला पुष्कळ आनंद झाला.
३ आ. भावसत्संगात डोळे मिटून शांत बसल्यावर ‘संपूर्ण आश्रम हालत आहे आणि ध्यानमंदिरात पुष्कळ प्रकाश पडून ते पूर्ण प्रकाशमय झाले आहे’, असे दिसणे अन् आश्रमात चंडियाग चालू असल्याने ‘देवीने प्रसन्न होऊन आश्रमात प्रवेश केला असेल’, असे वाटणे : त्यानंतर त्या भावसत्संग घेणार्या साधिकेने ‘आपण १० मिनिटे डोळे मिटून शांत बसूया आणि ‘काय जाणवते’, ते आपण पाहूया’, असे सांगितले. त्या वेळी मला ‘संपूर्ण आश्रम हालत आहे, हादरत आहे. ध्यानमंदिरात पुष्कळ प्रकाश पडला असून ते पूर्ण प्रकाशमय झाले आहे’, असे दिसले. त्या वेळी आश्रमात चंडियाग चालू असल्याने ‘देवीने प्रसन्न होऊन आश्रमात प्रवेश केला असेल’, असे मला वाटले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सुवर्णाच्या बिल्वपत्रांनी अभिषेक होणे
८.१०.२०१९ या दिवशी मला समजले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मस्तकावर सुवर्णाची ९ बिल्वपत्रे अर्पण करण्यात आली.’ त्या वेळी मला ५ आणि ६.१०.२०१९ या दिवशी दिसलेल्या दृश्यांची आठवण आली. त्या वेळी मला वाटले ‘अघोरी विद्येचे सूक्ष्मातील आवरण काढण्यासाठी जळालेला देह शुद्ध करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांवर सुवर्ण बिल्वपत्रांनी अभिषेक केला आणि भगवंताचा स्थूलदेह शुद्ध केला. भगवंत आपल्यासाठी किती यातना सहन करत आहे ? किती कष्ट घेत आहे ?’, हे प्रत्यक्ष दृश्य रूपात दाखवले.’ (१०.१०.२०१९)
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.