परळी (जिल्हा बीड) येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात २ दिवस पुरेल एवढाच कोळसा !
परळी (जिल्हा बीड) – येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कार्यान्वित ३ संचांपैकी २ संचांतून वीजनिर्मिती होत आहे. सध्या २ दिवस पुरेल एवढा कोळसा उपलब्ध असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले. ७५० मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या या केंद्रातून सध्या ३६५ मेगावॅट म्हणजेच निम्म्याने वीजनिर्मिती होत आहे. सध्या १२ सहस्र मेट्रिक टन कोळशाचा साठा असला, तरी २ दिवसांत कोळसा आला नाही, तर वीजनिर्मिती ठप्प होऊ शकते.
लातूर जिल्ह्याचे महावितरणचे अधिकारी दिलीप भोळे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात तूर्त तरी भारनियमन लागू झालेले नाही. लातूर जिल्ह्यासाठी लागणारी विजेची पूर्तता सध्या होत आहे. वीजपंपासाठीचे भारनियमन पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार चालू आहे. जनतेने विजेचा वापर काटकसरीने करावा.
भारनियमन होऊ शकते; पण निर्णय राज्यस्तरावर ! – सुंदर लटपटे, महावितरण मुख्य अभियंता, लातूर, बीड, धाराशिव
भारनियमन करावे लागेल, अशी सध्यातरी परिस्थिती नाही. अधिकाधिक वीज खरेदीचा पर्याय आहे. सध्या ‘ओपन मार्केट’मधून वीज खरेदी चालू आहे. राज्यात सध्या १३ संच बंद पडलेले आहेत; परंतु परिस्थिती बिघडली, तर शेतीपंप आणि शहर यांसाठी भारनियमनाची शक्यता आहे. शहरात ज्या ठिकाणी वीज चोरी आणि गळती अधिक आहे, अशा ठिकाणी भारनियमन होऊ शकते; परंतु याचा निर्णय राज्यस्तरावरून घेतला जाईल.