‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन म्हणजे त्यांचा संकल्पच असून साधकांनी त्यानुसार कृती केल्यास त्यांची तशी वृत्ती बनते’. श्री. नीलेश नागरे !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी केलेले मार्गदर्शन, म्हणजे त्यांचा संकल्पच आहे’, असे वाटणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा आणि गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या वेळी चित्रफितींच्या माध्यमातून गुरुदेवांनी सर्व साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व, तसेच अन्य विषय यांवर मार्गदर्शन केले. त्यातून असे लक्षात आले की, ‘गुरुदेवांनी सर्व साधकांसाठी स्वभावदोष निर्मूलन करण्यासाठी एक प्रकारे संकल्पच केला आहे.

२. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया नियमित आणि प्रामाणिकपणे चालू होऊन ‘ती आतूनच आपोआप होत आहे’, असे लक्षात येणे

‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना घेतल्याने साधनेविषयीच्या कोणत्याही समस्या सोडवता येतात’, हा भाग समजल्यावर सर्व साधकांनी अल्पाधिक प्रमाणात प्रयत्न चालू केले. गुरुदेवांच्या कृपेने माझेसुद्धा प्रामाणिक प्रयत्न चालू झाले. माझ्याकडून कृती आणि मन यांच्या स्तरांवरील प्रसंगांचे लिखाण नियमित होऊ लागले, तसेच प्रतिदिन १० सूचनासत्रेही होऊ लागली. पूर्वी सर्व साधक ‘दिवसभर स्वत:चा नामजप चालू आहे किंवा नाही’, याचे निरीक्षण करायचे. आता स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भातही ‘तशी प्रक्रिया आतूनच आपोआप होत आहे’, असे दिसून आले.

श्री. नीलेश नागरे

३. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया आतून होऊ लागल्याने स्वभावदोषांची जाणीव होऊन कृतीच्या स्तरावर सुधारणा होणे अन् प्रतिक्रिया न्यून होऊन आनंद मिळू लागणे

सूचनासत्र करण्याच्या सोबतच मला दिवसभर लक्षात आलेल्या स्वभावदोषांचीही सातत्याने जाणीव होऊ लागली. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेद्वारे माझी प्रगती होऊन आनंद मिळणार आहे’, असे मला वाटू लागले. त्यामुळे कृतीच्या स्तरावर सुधारणा होऊन माझी प्रत्येक कृती नीटनेटकी, व्यवस्थित, शांतपणे, नम्रपणे, प्रतिक्रियाविरहित आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी होऊ लागली. मनाच्या स्तरावरील प्रतिक्रिया उणावून मला पुष्कळ आनंद मिळू लागला.

४. स्वभावदोष निर्मूलनाविषयी सातत्याने मनात विचार येऊन तशी कृती आणि परिणामी वृत्ती बनल्याने परात्पर गुरुदेवांचे मार्गदर्शन, म्हणजे साधकांसाठी संकल्पच असल्याची प्रचीती येणे

गुरुदेवांच्या शिकवणीनुसार एखादा विचार मनात सातत्याने येऊन त्यानुरूप आपली कृती होते आणि एखादी कृती सातत्याने केली की, ती वृत्ती बनते. याप्रमाणे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याविषयी माझ्या मनात विचार येऊन त्यानुसार नियमित कृती होऊ लागली अन् आता ती वृत्तीच बनली आहे’, असे मला अनुभवयास आले. यातून परात्पर गुरु डॉक्टरांची महानता लक्षात येते. यावरून ‘परात्पर गुरुदेव ज्या वेळेस मार्गदर्शन करतात, त्याच वेळेस अप्रत्यक्षपणे ते सर्व साधकांसाठी संकल्पच करत असतात’, याची पुन्हा एकदा प्रचीती आली.

अशा ईश्वरस्वरूप महान परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व साधक साधना करत आहोत, हेच आपले सर्वांत मोठे भाग्य आहे. याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. नीलेश नागरे (वय ४० वर्षे), गंगापूर रस्ता, नाशिक. (२१.८.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक