नाशिक येथे मराठी साहित्य संमेलन १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार !

नाशिक – कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ मासांपासून लांबलेले ९४ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. त्यानुसार सिद्धते करण्याच्या सूचना संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या आहेत. ही सिद्धता चालू झाली असली, तरी संमेलनावर कोरोनाची टांगती तलवार मात्र कायम आहे.

जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर तालुक्यांत आणि शेजारील नगर जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे; मात्र पुढील दीड मासांतील कोरोनाच्या परिस्थितीवरच संमेलन होणार कि नाही हे अवलंबून असेल. कोरोनाची दुसरी लाट आणि नंतर निर्माण झालेली परिस्थिती यांमुळे हे संमेलन यापूर्वी रहित केले होते. साहित्य संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील काही गावांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ. ऐनवेळी धावपळ न होण्यासाठी सिद्धता करण्याच्या सूचना केल्या.