शक्तिदेवता !
नवरात्रीनिमित्त विशेष सदर…
‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेत आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेत आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया. ११ ऑक्टोबरला श्री कात्यायनीदेवीची वैशिष्ट्ये आणि तिचे कार्य यांविषयी माहिती पाहिली. आज त्या पुढील माहिती पाहूया.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे कालरात्री रूप, म्हणजे शुभंकरी !
आश्विन शुक्ल पक्ष सप्तमी (१२.१०.२०२१)
अ. नवरात्रीच्या सातव्या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे ‘कालरात्री’ हे स्वरूप पुष्कळ भयंकर असून त्या रूपाला सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरत असणे; मात्र ती शुभफलदायिनी असल्यामुळे तिला ‘शुभंकरी’ म्हटले जाणे : नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्यात येते. कालरात्रीदेवीचा रंग काळा आहे. या देवीच्या उच्छ्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. देवीला ब्रह्मांडासारखे गोल आकारांतील ३ नेत्र आहेत. तिचे वाहन गर्धभ (गाढव)आहे. कालरात्रीदेवीचे स्वरूप भयंकर आहे; मात्र ती नेहमी शुभफल देणारी आहे. त्यामुळेच कालरात्रीदेवीला ‘शुभंकरी’ (मंगलदायिनी) असे नाव दिले आहे. देवी कालरात्री म्हणजे आदिशक्तीचे विनाशकारी रूप आहे. देवीचे हे रूप पाहून सर्व दानव, भूत, प्रेत आदी घाबरतात. कालरात्रीदेवीची उपासना केल्याने ग्रहपीडा, अग्नीभय, जलभय, जंतूभय आणि शत्रूभय दूर होतात. कालरात्रीदेवी शुभंकरी असल्याने ती पापनाशिनी आणि पुण्यप्रदायिनी आहे. काली, कालिका ही कालरात्रीचीच रूपे आहेत.
प्रार्थना
‘हे कालरात्रीदेवी, या जगात सुर आणि असुर ही दोन्ही रूपे तुझीच आहेत. तू असुर आणि देवता यांची जननी आहेस. जेव्हा असुरांचे वर्चस्व वाढते आणि धर्माचा र्हास होतो, तेव्हा तू असुरांचा नाश करतेस. आताही पृथ्वीवर वाईट दुष्प्रवृत्तींनी थैमान घातले आहे. त्यांनी पृथ्वीवरील स्त्रिया आणि दुर्बल मनुष्य यांवर अनेक अत्याचार केले आहेत. मनुष्यामध्ये नास्तिकता वाढू लागली आहे आणि वृत्ती पशूप्रमाणे होऊ लागली आहे. हे महाकालस्वरूपिणी कालरात्रीदेवी, आता तू या असुरी दुष्प्रवृत्तींच्या नाशासाठी प्रकट हो आणि त्यांचे समूळ उच्चाटन कर’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग (६६ टक्के आध्यात्मिक पातळी), बेंगळुरू (२३.९.२०२१)