तिलारी धरणाच्या कालव्याला मणेरी येथे भगदाड
|
|
दोडामार्ग, १० ऑक्टोबर (वार्ता.) – महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिलारी धरणाच्या मणेरी, धनगरवाडी येथील डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह लोकांची शेती आणि काजू बागायती यांच्यामध्ये शिरला. ९ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे ३ वाजता ही घटना घडली. विशेष म्हणजे याच कालव्याला जानेवारी मासात भेडशी, खानयाळे येथे भगदाड पडले होते. त्यानंतर १० मासांतच दुसर्यांदा अशी घटना घडल्याने कालव्याच्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कुडासे-मणेरी-दोडामार्ग-केळीचे टेंब-आंबेली-गोवा हा तिलारीचा डाव्या मुख्य कालव्याचा मार्ग आहे. यापूर्वी म्हावळणकरवाडी येथे कालव्याचा काही भाग कोसळला होता, तर ९ ऑक्टोबर या दिवशी रात्री मणेरी, धनगरवाडी येथे भगदाड पडलेल्या ठिकाणी पूर्वी गळती चालू झाली होती. स्थानिक शेतकरी, तसेच केळी आणि अननस यांची लागवड करणारे यांनी याविषयीची माहिती संबंधित खात्याला यापूर्वी दिली होती; मात्र अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले. १० ऑक्टोबर या दिवशी शेतकरी गुरांना घेऊन गेले असता पाऊस नसूनही अचानक नाला आणि काजू बागायती यांच्यामध्ये पाणी भरल्याने कालवा फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना प्रारंभ झाला. संबंधित अधिकारी, तसेच महसूल विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्याचा पाणीपुरवठा तातडीने बंद केला. तिलारी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या बांधकामांना अनेक वर्षे झाली आहेत; मात्र त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत असल्याने हे दोन्ही कालवे अखेरची घटका मोजत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. गोवा सरकारने आपल्या हद्दीतील कालव्याची कामे पारदर्शकपणे केल्याचे स्थानिकांचे मत आहे. स्थानिकांच्या मते गेल्या ३० वर्षांत कालव्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात येते; मात्र प्रत्यक्षात किती काम केले जाते, याविषयी स्थानिकांमध्ये प्रश्नचिन्ह आहे.
तिलारी धरण प्रकल्पाच्या अधिकार्यांचे देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ! – प्रवीण गवस, भाजप तालुकाध्यक्ष
याविषयी भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कालव्यांच्या भिंतीवरून अवजड वाहने राजरोसपणे ये-जा करत आहेत; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. काम उरकून घेण्यासाठी ठेकेदार नेमून निकृष्ट कामे केली जात आहेत. शासन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी देत असलेला निधी लवकरात लवकर कसा खर्ची पडेल, याकडे लक्ष दिले जात आहे. तिलारी धरण प्रकल्पाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने तिलारी धरणाच्या नजीक काळ्या दगडाच्या खाणी अवैधरित्या चालू आहेत. त्यामुळे दगडांच्या खाणीत दगड फोडण्यासाठी केल्या जाणार्या स्फोटांमुळे (ब्लास्टिंगमुळे) भविष्यात धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. धरणाचे कालवे फुटण्याच्या घटना यापुढे घडतच रहातील. त्याला निकृष्ट काम हे कारण ठरेल.