देवद आश्रमातील साधक श्री. अमित हावळ यांना श्री दुर्गादेवीचा नामजप करतांना तिचे अस्तित्व जाणवणे
१. श्री दुर्गादेवीचा नामजप करत असतांना साधक झोपलेले पाहून ‘श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सूर-असुर यांच्या सूक्ष्म युद्धात आपले साधकच ग्लानी येऊन झोपी जात आहेत’, असे जाणवणे
‘२२.४.२०२० या दिवशी मी श्री दुर्गादेवीचा नामजप करत होतो. त्या वेळी मला ग्लानी येत होती; म्हणून मी डोळे उघडे ठेवून नामजप करण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्या वेळाने माझे लक्ष सतत सर्व साधकांकडे जाऊ लागले. नामजप करणार्या काही साधकांना तीव्र ग्लानी येऊन ते झोपी गेले होते, तर काही साधक पटलावर हात पसरून डोके टेकून झोपले होते. ते पाहून श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सूर-असुर सूक्ष्म युद्धात आपले साधक ‘जागे राहून नामजप करण्याऐवजी, तसेच लढाऊ वृत्तीने त्रासदायक शक्तीचे आवरण काढण्याऐवजी नामजप न करता ग्लानी येऊन झोपी जात आहेत’, असे दिसत होते.
२. सभागृहाच्या मध्यभागी श्री दुर्गादेवीचे दर्शन होऊन ‘ती हातातील शस्त्रांनी सूक्ष्म युद्ध करून साधकांचे रक्षण करत आहे’, असे दिसणे आणि ते दृश्य पाहून भाव जागृत होणे
तेव्हा सभागृहाच्या मध्यभागी सूक्ष्मातून साक्षात् आई दुर्गादेवीच जणू उभी आहे. तिच्या दाही हातांत शस्त्रे आहेत. ती तिच्या हातांतील शस्त्रांनी ‘कधी ढाल, कधी तलवार, तर कधी त्रिशूळाने, तसेच कधी पाश आणि कधी सुदर्शनचक्र अशा रितीने सर्व शस्त्रे ग्लानी आलेल्या साधकांवर सोडत आहे’, असा मी भाव ठेवला. हे दृश्य समोर येत असतांना श्री दुर्गादेवी लढतांनाचे दृश्य दिसत होते.
‘साक्षात् श्री दुर्गादेवी साधकांचे रक्षण करण्यासाठी आली आहे आणि सर्व साधकांवर कृपा करून त्यांना असुररूपी ग्लानी अन् त्रासदायक शक्तीचे आवरण यांतून बाहेर काढत आहे’, हे पाहून माझा भाव जागृत होत होता. देवीने सुदर्शनरूपी चक्र सोडले, तेव्हा साधकांच्या डोक्यावरती पंखे चालू होते. ते प्रत्यक्ष सुदर्शनचक्र असल्याप्रमाणे जाणवत होते. सुदर्शनचक्र साधकांच्या मस्तकावर फिरत असून त्यांच्यावरील ‘त्रासदायक शक्तीचे आवरण आणि ग्लानी यांतून त्यांना बाहेर काढत आहे’, असे जाणवले.
‘हे श्रीकृष्णा, या अनुभूतीतून जागृतावस्थेत राहून ‘भावपूर्ण आणि लढाऊ वृत्तीने नामजप कसा करायचा ? हे शिकवलेस’, यासाठी मी तुझ्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. अमित हावळ, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.४.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |