(म्हणे) ‘संसदेत महात्मा गांधी यांच्या छायाचित्राच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र का ?’ – काँग्रेसचे खासदार शशी थरूर
हाच प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनीही विचारला, तर आश्चर्य वाटू नये ! स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त आणि अखंड भारताचे पाठीराखे होते. त्यामुळे फाळणीला मान्यता देणार्या गांधी यांच्या शेजारी यांचे छायाचित्र लावणे हा त्यांचा अवमानच आहे, असेच कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक
नवी देहली – देशातील एक गट असा आहे की, जो स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘राष्ट्रवादी’ या नात्याने पहातो, तर दुसरा गट सावरकरांना इंग्रजांकडे सुटकेसाठी याचिका प्रविष्ट करणारे, इंग्रजांकडून निवृत्तीवेतन घेणारा माणूस म्हणून पहातो. त्यामुळे आमच्यातील काही जणांना ही गोष्ट समजणे कठीण आहे की, संसदेत गांधी यांच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र कशासाठी लावले आहे ?, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना विचारला. या वेळी उपस्थित इतिहासकार विक्रम संपत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निगडित अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या. या वेळी शशी थरूर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. याला विक्रम संपत यांनी उत्तरे दिली.
१. चर्चा चालू असतांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नेमके कोण होते ?’, ‘ते स्वातंत्र्यसैनिक होते, हिंदुत्वनिष्ठ होते कि मुसलमानविरोधी होते ?’, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देतांना विक्रम संपत यांनी म्हटले की, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांचे एक मिश्रण होते. जी विनंती किंवा याचिका प्रविष्ट करण्याची गोष्ट केली जाते, ती वास्तविक सावरकर यांची दया याचिका नव्हती. तसेच निवृत्तीवेतनाविषयी बोलायचे झाले, तर ते अन्य अनेक स्वातंत्रसैनिकांना मिळत असे.
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट ‘फाळणीचा स्मरण दिवस’ म्हणून मानला जाईल, अशी घोषणा केली होती. यावर थरूर म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांची ही गोष्ट चुकीची आहे. ते आम्हाला पटलेले नाही.’’ याला उत्तर देतांना विक्रम संपत म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी योग्य गोष्ट केली आहे; कारण इतिहास लक्षात ठेवला की, कोणत्या गोष्टींची, घटनांची पुनरावृत्ती करायची नाही, हे समाजाच्या कायम स्मरणात रहाते. (तसेच फाळणीला कोण उत्तरदायी होते आणि काँग्रेस कशी भारतद्रोही होती, त्यांचे प्रमुख नेते कसे राष्ट्रघातकी होते, हेही भारतियांनी नेहमीच स्मरणात राहील ! – संपादक)