महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी (श्री दुर्गादेवी) !

सिंहावर आरूढ असलेली श्री कात्यायनीदेवी

१. देवी कात्यायनी आणि महिषासुर यांचे युद्ध !

१ अ. दानवराज दनूच्या पुत्रांनी पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या करणे, त्याची तपश्चर्या भंग करण्याच्या प्रयत्नांत देवांकडून करंभ मारला जाणे : आज आपण ‘देवीने महिषासुराचा वध कसा केला ?’, ते जाणून घेऊया. श्रीमद् देवीभागवताच्या पाचव्या स्कन्धात महिषासुर वधाची कथा आहे. दानवराज दनूचे करंभ आणि रंभ नावाचे दोन पुत्र होते. दोघांनाही मूल नव्हते. मूल होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. देवतांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत करंभ असुराचा मृत्यू होतो.

१ आ. करंभचा भाऊ रंभ क्रोधित होऊन स्वतःचे शिर अग्नीमध्ये अर्पण करायला निघणे; परंतु अग्निदेवतेने त्याला तसे करण्यापासून परावृत्त करणे, तेव्हा रंभच्या इच्छेनुसार त्याला अग्निदेवाकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळणे : तेव्हा रंभला पुष्कळ राग येतो. तो त्या क्रोधावस्थेतच अग्निदेवाला स्वतःचे मस्तक अर्पण करायला निघतो. तत्क्षणी अग्निदेव प्रकट होऊन त्याला असे करण्यापासून परावृत्त करतो. रंभ अग्निदेवाकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागून घेतो. तो ‘देवता, दानव आणि मनुष्य’ यांच्याशी युद्धात पराजित न होणारा आणि ‘इच्छेनुसार स्वतःचे रूप पालटू शकणारा असावा’, असे वरदान रंभासुर अग्निदेवाकडून मागून घेतो. अग्निदेव म्हणतो, ‘ज्या सुंदरीविषयी तुला प्रेम वाटेल, तिच्याकडून तुला दोन पुत्रांची प्राप्ती होईल.’

श्री. विनायक शानभाग

१ इ. रंभ आणि म्हैस यांच्या चिताग्नीतून ‘महिषासुर’ प्रकट होणे, पुढे महिषासुराने कठीण तपश्चर्येद्वारे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेणे आणि ‘मला एका स्त्रीकडून मृत्यू येऊ दे’, असा वर मागून घेणे : पुढे दानवराज रंभला एक म्हशीकडे बघून कामभावना निर्माण होते. त्याच्या वीर्याने ती म्हैस गर्भवती होते. त्या म्हशीकडे बघून कामांध झालेला एक रेडा तिच्याजवळ येतो. रंभ आणि त्या रेड्यामध्ये झालेल्या युद्धात रंभ मरतो. रंभाच्या चितेवर ती म्हैस सती जाते. तेव्हा आधी त्या चिताग्नीतून ‘महिषासुर’ प्रकट होतो. थोड्या वेळाने त्या चिताग्नीतून रंभ असुर ‘रक्तबीज’ असुराच्या रूपात प्रकट होतो. सर्व दानव एकत्र येऊन त्याला राजा घोषित करतात. पुढे महिषासुर कठीण तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो. महिषासुर ब्रह्मदेवाकडून ‘देव, दानव आणि पुरुष यांच्या हातून मृत्यू न येता मला एक स्त्रीकडून मृत्यू येऊ दे’, असा वर मागून घेतो. महिषासुराला वाटते, ‘स्त्री अबला आहे. जगात अशी कुठलीही स्त्री नाही, जी माझ्याशी युद्ध करू शकेल.’

१ ई. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे महिषासुराला कुणीही पराजित करू न शकणे, त्यामुळे ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति उत्पन्न होणे : ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यावर महिषासुर अजूनच अहंकारी होतो. तो सर्वांना त्रास देऊ लागतो आणि शेवटी देवतांनाही युद्धात पराजित करतो. संपूर्ण देवलोक त्याच्या हातात येतो. त्यामुळे सर्व देव पळून एका गुहेत रहातात. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णु आणि शिवही महिषासुराशी युद्ध करूनही त्याचा वध करू शकत नाहीत. शेवटी सर्व देवता, ब्रह्मदेव आणि शिव वैकुंठात जाऊन ‘श्रीविष्णूकडे याविषयी काही उपाय आहे का ?’, असे विचारतात. तेव्हा श्रीमहाविष्णु सांगतो, ‘सर्व देवतांच्या तेजाने निर्माण झालेली एक दिव्य शक्ति महिषासुराचा वध करू शकते. कात्यायन ऋषींच्या आश्रमात ब्रह्मदेव, शिव, विष्णु आणि सर्व देवतांच्या तेजातून एका देवीची उत्पत्ती होते. सर्व देवता त्यांची आयुधे आणि अलंकार त्या देवीला देतात. अष्टादश, म्हणजे १८ भुजा असलेली देवी सिंहावर आरूढ असते.

१ उ. देवीने सर्व देवतांना ‘मी महिषासुराचा वध करीन’, असे आश्वस्त करणे, देवीने महिषासुराला युद्ध करण्याचे आवाहन देणे : सर्व देवता त्या देवीची स्तुती करतात. ती स्तुती ऐकून देवी सर्व देवतांना आश्वस्त करते, ‘मी महिषासुराचा वध करीन.’ यानंतर देवी मोठ्याने हसते. देवीचा हसण्याचा नाद एवढा मोठा असतो की, ‘एका क्षणासाठी संपूर्ण विश्वच हलते. त्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात, सुमेरू पर्वत हलतो आणि दानव घाबरतात. ‘हे कुणाचे हास्य आहे ?’, हे जाणून घेण्यासाठी महिषासुर एका दूताला पाठवतो. दूत महिषासुराला सिंहावर आरूढ असलेल्या सुंदर देवीचे वर्णन करतो. ते ऐकून महिषासुराच्या मनात देवीशी विवाह करण्याचा विचार येतो; मात्र देवी त्याच्याशी युद्ध करण्याविषयी सांगते. महिषासुर देवीला बंदी बनवून आणण्यासाठी एक एक करून अनेक शूरवीर दानवांना पाठवतो; मात्र देवी त्या सर्वांना मारून टाकते. दानव सैनिकांना देवीचा सिंहच मारून टाकतो. शेवटी महिषासुराला युद्धभूमीवर यावेच लागते.

१ ऊ. शेवटी देवी कात्यायनीने सुदर्शनचक्राने त्याचे डोके शरिरापासून वेगळे करून त्याचा वध करणे : दानव जेवढे पराक्रमी असतात, तेवढेच ते बुद्धीहीन असतात. महिषासुर देवीशी युद्ध करायला जातो; मात्र देवीला पाहून तो मंत्रमुग्ध होतो. तो सर्व अस्त्र-शस्त्र यांचा त्याग करून देवीला शरण जातो. तो देवीला सांगतो, ‘‘मी तुझी पत्नीरूपात सेवा करतो.’’ तेव्हा देवी त्याला म्हणते, ‘‘परमेश्वररूपी पुरुष सोडून अन्य कुणी पुरुष नाही. ज्या परमेश्वराने या विश्वाची उत्पत्ती केली आहे, त्याचे मी सतत ध्यान करत असते. तोच माझा सर्वस्व आहे.’’ महिषासुर देवीला ‘स्त्रीने बलशाली पुरुषाशी विवाह का करावा ?’, याविषयी अनेक गोष्टी सांगतो; मात्र देवी नकार देते. शेवटी महिषासुर देवीशी युद्ध करतो आणि देवी सुदर्शनचक्राने त्याचे डोके शरिरापासून वेगळे करते. तेव्हा देवता आणि ऋषीगण आनंदी होऊन देवीची स्तुती करतात.

२. वर्तमानकाळातही पृथ्वीवर आसुरी वृत्तीचे लोक असणे

आज पृथ्वीवरही महिषासुरासारखी वागणारी मंडळी पुष्कळ आहेत. हे दुष्प्रवृत्तीचे लोक सध्या स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करून त्यांचा छळ करत आहेत. ‘स्त्रीचा अनादर करणे, तिला तुच्छ लेखणे, तिला केवळ सुख उपभोगण्याचे माध्यम समजणे’, अशी पाशवी वृत्ती महिषासुरातही होती; म्हणून आदिशक्तीने त्याचा वध केला. (साभार : श्रीमद् देवीभागवत, स्कंद ५)

‘हे कात्यायनीदेवी, या जगात वर्तमानातील सर्व महिषासुररूपी दैत्यांचा तू वध कर आणि त्यांना नेहमीसाठी पाताळात पाठव. हे देवी, तुला सोडून आम्ही अन्य कुणाला शरण जाणार ? हे आई जगदंबे, तुझ्या मणिद्वीपातून तू आमच्यासाठी पुन्हा प्रकट हो आणि म्लेंच्छांचा (सुसंस्कार नसलेल्यांचा) नाश कर.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) , जयपूर, राजस्थान (२०.०९.२०२१)

(‘आज आपण महिषासुराची गोष्ट पाहिली. या जगात रक्तबीजसारख्या दुष्प्रवृत्ती आहेत. त्याविषयी आपण उद्याच्या अंकात पाहूया.’ – संकलक)