राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आर्यन शाहरुख खानची चिंता आहे कि अमली पदार्थ विक्री करणार्या टोळक्यांची चिंता आहे ? – गोपिचंद पडळकर, आमदार, भाजप
सांगली, १० ऑक्टोबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांना भाजपवर बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. ‘क्रूझ’वर जेव्हा धाड टाकण्यात आली, तेव्हा त्यावर १ सहस्र ३०० लोक प्रवास करत होते. यातील ज्यांनी गुन्हा केला त्यांनाच अटक करण्यात आली. जेव्हा नवाब मलीक यांच्या जावयाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली, तेव्हा नवाब मलीक का गप्प होते ? आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आर्यन शाहरुख खानची चिंता आहे कि अमली पदार्थ विक्री करणार्या टोळक्यांची चिंता आहे ?, असा प्रश्न भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे. ते नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलत होते.
गोपिचंद पडळकर पुढे म्हणाले, ‘‘तुमचे सरकार वसुलीत गुंग असल्याने अमली पदार्थविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनाच कारवाई करावी लागत आहे. या प्रकरणाचे सखोल अन्वेषण केल्यास तुमचे ‘ड्रग्स’ टोळक्यांशी असणारे लागेबांधे उघडे पडणार आहेत, असा काही प्रकार नाही ना? या भीतीपोटी, तर तुम्हाला झोप लागत नाही ना?,’’