मराठवाडा येथील अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ ! – कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांची घोषणा
संभाजीनगर – अतीवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकर्यांचे झालेली प्रचंड हानी पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे १० सहस्र रुपये शैक्षणिक शुल्क माफ केले आहे. अधिसभेचे सदस्य अधिवक्ता संजय काळबांडे यांनी विद्यापिठाच्या अधिसभेत ही मागणी केली होती. त्याला इतरांनी पाठिंबा दिला. यावर कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठ ‘कॅम्पस’मधील विविध शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा केली.
११ परकीय भाषा अभ्यासक्रमांचे शुल्क ८०० रुपयांवरून १० सहस्र रुपये केल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याचे पडसाद अधिसभेत उमटले होते. त्यानंतर डॉ. प्रमोद येवले यांनी ‘वर्ष २०२१-२२ या वर्षासाठी केलेली शुल्कवाढ मागे घेत आहे’, असे घोषित केले, तसेच महाविद्यालयांनीही अशी शुल्कमाफी द्यावी, यासाठी संबंधितांना आवाहन करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केवळ दुष्काळग्रस्तांची माहिती आहे !कुलगुरु डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘‘कोविडमुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात शुल्कमाफी दिली होती. वर्ष २०१९-२० या कालावधीत अतीवृष्टीग्रस्तांच्या पाल्यांना माफी दिली होती. अशी पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांची सूची आहे. नवीन विद्यार्थ्यांच्या उत्पन्नावरूनही कळते. त्यामुळे ज्यांच्या पिकांची हानी झाली आहे. त्यांना शुल्कमाफी दिली आहे.’’ |