मडगाव नगरपालिका मंडळाच्या ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद ! – मुख्याधिकारी फर्नांडिस
‘कर वेळच्या वेळी भरला जाईल’, अशी यंत्रणा उभी केल्यास ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेसारख्या मोहिमा पालिकेला राबवाव्या लागणार नाहीत !
मडगाव, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – मडगाव नगरपालिका मंडळाच्या ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती नरगापालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिली आहे. पालिका मंडळाने ९ ऑक्टोबर या दिवशी मासाच्या (महिन्याच्या) दुसर्या आठवड्याअखेर ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहीम राबवली आणि याद्वारे पालिकेला करापोटी ३ लक्ष ३१ सहस्र २०० रुपये निधी मिळाला.
पालिकेचा कर चुकवणार्या व्यावसायिकांना पालिकेने कर भरण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ ही मुदत निश्चित केली होती. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी स्वत: पुढाकार घेऊन ‘आठवडाअखेर करवसुली’ मोहीम राबवण्यास प्रारंभ केला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून पालिकेने विविध गट सिद्ध करून या गटांच्या माध्यमातून कर चुकवणार्यांना कर भरण्याची आठवण करून देणे यापूर्वीच चालू केले आहे. या जागृती मोहिमेची फलनिष्पत्ती म्हणजे मडगाव पालिकेत कर भरण्यासाठी संबंधितांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. कर भरण्यासाठी पालिकेने ‘ऑनलाईन’ सुविधाही उपलब्ध केली आहे.