(म्हणे) ‘क्रूझ’वरील धाड बनावट, केंद्रशासनाने समिती स्थापन करून याची चौकशी करावी !’ – नवाब मलिक
अमली पदार्थ सेवन करणार्यांची बाजू घेणारे नवाब मलिक आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार यांचा नेमका काय संबंध आहे ? याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेच जनतेला वाटते ! – संपादक
मुंबई – ‘क्रूझ’वरील पार्टीमध्ये एकूण ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांतील ऋषभ सचदेव, प्रतीक गाभा, अमीर फर्निचरवाला यांना भाजपच्या नेत्यांच्या दबावामुळे सोडण्यात आले. ही धाड बनावट होती. केंद्रशासनाने समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ९ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी नवाब मलिक म्हणाले, ‘‘ऋषभ सचदेव हा भाजप नेत्याचा मेहुणा आहे. त्याला सोडण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्यांना कुणाला दूरभाष आला होता ?, हे समोर आले पाहिजे. अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य अधिकारी यांच्या दूरभाषवरील संभाषणाची पडताळणी करावी. मुंबई पोलिसांनी या संभाषणाचा तपशील मागवून घ्यावा. अमली पदार्थविरोधी पथक आणि भाजपचे नेते मुंबई आणि चित्रपटसृष्टी यांना अपकीर्त करण्यासाठी हे कुंभाड रचत आहेत.’’ (चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अमली पदार्थांचे सेवन करतात, हे जगजाहीर असतांना त्यांना वेगळे अपकीर्त करण्याची काय आवश्यकता ? – संपादक)