प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे सिद्ध होणे
संतांच्या कुटुंबियांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.
३ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांना जीवनभर साथ देणार्या त्यांच्या पत्नी पू. नलिनी (पू. ताई) आठवले यांची वैशिष्ट्ये पाहिली. आज १० ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेले निरीक्षण येथे पहाणार आहोत. (भाग ३)
द्वितीय भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/515955.html
‘महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात अनेक थोर संतमहात्मे होऊन गेले. १३ व्या शतकात महाराष्ट्रात जन्म घेतलेले संत ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः उच्चकोटीचे संत होते आणि त्यांचे आई-वडील अन् बंधु-भगिनी हेही सर्व संत होते. आताच्या कलियुगातील असेच एक उदाहरण म्हणजे ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदावरील संत असून त्यांचे आई-वडील (प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई) आणि त्यांचे थोरले बंधू (सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले अन् पू. अनंत बाळाजी आठवले) हे सर्वजण संत आहेत. (परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन धाकट्या बंधूंचीही आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक आहे.) संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असून ते त्यांच्या छायाचित्रांतूनही प्रक्षेपित होते. प.पू. दादा आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. प.पू. दादा आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तमाचे प्रमाण अधिक असल्याने तिच्यामध्ये सकारात्मक स्पंदने आढळून येत नाहीत. साधनेमुळे व्यक्तीतील रज-तम न्यून होऊन तिच्यातील सत्त्वगुण वाढू लागतो. साधना असलेल्या व्यक्तीमध्ये सकारात्मक स्पंदने आढळून येतात अन् तिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. जसजशी तिची साधना वाढते, तसतसे हे प्रमाण वाढत जाते. चाचणीतील संतांच्या छायाचित्रांमध्ये नकारात्मक स्पंदने काहीच नसून पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली. हे खाली दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
टीप १ – सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांचे हे छायाचित्र त्यांनी ‘संत’ पद (टीप ३) प्राप्त केले त्या काळातील आहे. ९.११.२०१३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. वर्ष २०१७ मध्ये त्यांनी ‘सद्गुरु’ पद प्राप्त केले.
टीप २ – चाचणीस्थळी जागा अपुरी पडल्याने त्यापुढे अचूक प्रभावळ मोजता आली नाही.
टीप ३ – ७०-७९ टक्के पातळीला ‘संत’ पद (‘गुरु’ पद), ८०-८९ टक्के पातळीला ‘सद्गुरु’ पद आणि ९० टक्के पातळीच्या पुढे ‘परात्पर गुरु’ पद प्राप्त होते.
२. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
या चाचणीतील प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या छायाचित्रांतून उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या साधनेमुळे त्यांची अध्यात्मात उत्तरोत्तर पुष्कळ प्रगती होत गेल्याचे हे द्योतक आहे. साधना न करणार्या सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. चांगली साधना करून जेव्हा व्यक्तीची पातळी ७० टक्के होते तेव्हा ती ‘संत’ होते. संतांमध्ये त्यांच्या साधनेमुळे चैतन्य निर्माण झालेले असते. जसजशी संतांची आध्यात्मिक पातळी वाढत जाते, तसतसे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाणही वाढत जाते. ‘वर्ष २०१४ मध्ये प.पू. दादा यांची आध्यात्मिक पातळी ८३ टक्के आणि पू. ताई यांची आध्यात्मिक पातळी ७५ टक्के होती. प.पू. दादा यांनी २८.१.१९९५ या दिवशी आणि पू. ताई यांनी ३.१२.२००३ या दिवशी देहत्याग केला.’ (संदर्भ : सनातन संस्था प्रकाशित ग्रंथ – पू. बाळाजी आठवले यांचे विचारधन : खंड १ आणि २)
३. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या पुत्रांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या पाचही मुलांवर लहानपणापासूनच साधनेचे संस्कार केले. त्यांनी स्वतः अध्यात्मात चांगली प्रगती केलीच; पण त्यांच्या पाचही मुलांवर साधनेचे संस्कार करून त्यांचीही प्रगती करवून घेतली. आताच्या काळात अशी उदाहरणे विरळाच पहायला मिळतात. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांचे तिघेही पुत्र संत असल्याने त्यांच्या छायाचित्रांतूनही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले हे ‘सद्गुरु’पदी, त्यांचे दुसरे पुत्र पू. अनंत बाळाजी आठवले हे ‘संत’पदी आणि त्यांचे तिसरे पुत्र परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘परात्पर गुरु’पदी विराजमान झाले आहेत. या सर्व संतांच्या छायाचित्रांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ त्यांच्या त्या त्या वेळीच्या आध्यात्मिक पातळीनुसार आहे. प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांचे पुत्र डॉ. सुहास आठवले अन् श्री. विलास आठवले यांचीही साधनेत प्रगती होत आहे. त्यामुळे त्यांच्याही छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून आली. आताच्या कलियुगातही असे आदर्श संत कुटुंब पहायला मिळत आहे, याबद्दल ईश्वरचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१७.९.२०२१) (क्रमशः)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. |