संत ज्ञानेश्वरांचे चरित्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे ! – बापूसाहेब ढगे, उपाध्यक्ष, भावसार शिक्षण प्रसारक मंडळ
सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी
सोलापूर, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील भावसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यानिकेतन प्रशाला आणि हिंगुलांबिका प्राथमिक शाळा यांच्या वतीने विद्यानिकेतन प्रशालेत श्री ज्ञानेश्वरी जयंती २७ सप्टेंबर या दिवशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भावसार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बापूसाहेब ढगे यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. या वेळी बापूसाहेब ढगे यांनी ‘संत ज्ञानेश्वरांचे चरित्र आणि ज्ञानेश्वरीतील सार विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शिकवावे. सध्या शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना संस्कारांचीही आवश्यकता आहे’, असे सांगितले. सहशिक्षक नितीन मुसळे यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची महती सांगितली, तर हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद हंचाटे यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा इतिहास सांगितला.
या वेळी विद्यानिकेतन प्रशालेचे मुख्याध्यापक भगवान माने यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातील १८ अध्यायांचे सार थोडक्यात सांगितले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक गोपीचंद नवले यांनी केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका अनिता क्षीरसागर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संतोष बनसोडे यांनी केले, तर सहशिक्षक सचिन बंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमात प्रशालेतील शिक्षक आणि कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.