चाकण (पुणे) औद्योगिक वसाहतीतील कामगारांमुळे स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !

पुणे, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात औद्योगिक वसाहतीतील विविध आस्थापनांचे कामगार कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी दररोज मोठी रांग लावत आहेत, तसेच त्यांच्या कुटुंबांतील सदस्यही लसीकरणासाठी येत आहेत. आस्थापनांनी स्वखर्चाने कामगारांचे लसीकरण करावे, असे सरकारी आदेश आहेत; मात्र अनेक आस्थापने यांकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्णालयात लसीकरणासाठी सध्या गर्दी होत आहेत. त्यामुळे घंटोन्घंटे रांगेत ताटकळत थांबूनही स्थानिक नागरिकांना लस मिळत नसल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रुग्णालयातील जुन्या इमारतीबाहेर लसीकरणासाठी कामगार सकाळपासूनच गर्दी करतात. लसीकरणासाठी येणारे लस न दिल्यास उद्धटपणे बोलत असल्याचे आरोग्य कर्मचार्‍यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णालयातील गर्दी रोखायची कशी ? हा प्रश्न या कर्मचार्‍यांपुढे निर्माण झाला आहे. रांगेतील नंबरवरून स्थानिक नागरिक आणि कामगार यांत वादविवाद होत आहेत. काही प्रकरणे हाणामारीपर्यंत देखील जात आहेत. त्यातून आरोग्य कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. आस्थापनांनी कामगारांचे लसीकरण त्यांच्या फंडातून करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

चाकण येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राम गोरे म्हणाले की, आस्थापनांनी त्यांच्या फंडातून कामगारांना लस उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर ताण येणार नाही, तसेच कामगार आणि स्थानिक यांच्यात वाद होणार नाहीत.

चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे म्हणाल्या की, बहुतांश आस्थापनांतील कामगार लसीकरणासाठी येत आहेत; मात्र आस्थापनांनी सरकारच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या निधीतून लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रुग्णालयात लस उपलब्ध होईल.