आश्विन मासातील (१०.१०.२०२१ ते १६.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘७.१०.२०२१ दिवसापासून आश्विन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१.  हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, शरदऋतू, आश्विन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. ललितापंचमी : आश्विन शुक्ल पक्ष पंचमीला ‘ललितापंचमी’ हे व्रत करतात. ‘ललितादेवी’ ही या व्रताची देवता आहे. या व्रतामुळे सर्व कष्टांचे निवारण होऊन आनंद प्राप्त होतो. १०.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.१५ पर्यंत पंचमी तिथी आहे.

२ आ. पंचरात्रोत्सवारंभ : नवरात्रीपूर्वी अशौच आल्याने प्रतिपदा तिथीला घटस्थापना करता येणार नसेल, तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ किंवा एकरात्रोत्सवारंभ, असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसांचे नवरात्र करावे. पंचरात्रोत्सवारंभात आश्विन शुक्ल पंचमीपासून नवमीपर्यंत पाच दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. १०.१०.२०२१ या दिवशी पंचरात्रोत्सवारंभ आहे.

२ इ. घबाड मुहूर्त : हा शुभमुहूर्त आहे. ११.१०.२०२१ या दिवशी दुपारी १२.५६ पासून रात्री ११.५१ पर्यंत आणि १६.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.३८ पासून दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५३ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ई. त्रिरात्रोत्सवारंभ : त्रिरात्रोत्सवारंभात आश्विन शुक्ल सप्तमीपासून नवमीपर्यंत तीन दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. १२.१०.२०२१ या दिवशी त्रिरात्रोत्सवारंभ आहे.

२ उ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १२.१०.२०२१ या दिवशी रात्री ९.४८ पासून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.५५ पर्यंत आणि १५.१०.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.४७ पासून १६.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ५.३८ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ऊ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. अनिष्ट शक्तींचा नाश होऊन भयमुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी दुर्गासप्तशतीस्तोत्र, कवच, अर्गलास्तोत्र आदी देवीस्तोत्रांचे वाचन करतात. १३.१०.२०२१ या दिवशी रात्री ८.०८ पर्यंत अष्टमी तिथी आहे.

२ ए. एकरात्रोत्सवारंभ : एकरात्रोत्सवारंभात एक दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतात. १३.१०.२०२१ या दिवशी एकरात्रोत्सवारंभ आहे.

२ ऐ. विजयादशमी या दिवशी दुपारी २.२१ पासून दुपारी ३.०८ पर्यंत ‘विजय मुहूर्त’ आहे.

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), नवरात्रोत्थापन, विजयादशमी (दसरा), सीमोल्लंघन, अपराजिता आणि शमीपूजन यांविषयीची माहिती सनातनने प्रकाशित केलेल्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’, ‘धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र’, तसेच ‘शक्तीची उपासना’ या ग्रंथांत आहे.

२ ओ.  श्री मध्वाचार्य जयंती : श्री मध्वाचार्य यांचा जन्म दक्षिण कन्नड या जिल्ह्यामध्ये उडुपी येथे झाला. ते वर्ष १२३८ ते १३१७ या काळातील तत्त्वज्ञानी होते. बालपणापासून वेद आणि वेदांग यांविषयी त्यांना ज्ञान होते. त्यांनी प्रमुख तत्त्वज्ञानांपैकी ‘द्वैत तत्त्वज्ञान’ सादर केले. त्याला ‘द्वैत दर्शन’ म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार श्री मध्वाचार्य यांना वायुदेवांचा ‘तृतीय अवतार’ मानले जाते. १५.१०.२०२१ या दिवशी श्री मध्वाचार्य यांची जयंती आहे.

२ औ. पाशांकुशा एकादशी : आश्विन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘पाशांकुशा एकादशी’ हे नाव आहे. १६.१०.२०२१ या दिवशी पाशांकुशा एकादशी आहे. या एकादशीला श्रीविष्णूच्या ‘पद्मनाभ’ रूपाची पूजा करतात. या एकादशी व्रतामुळे पापक्षालन होते. यासाठी कळत नकळत केलेल्या पापासाठी प्रायश्चित घ्यावे. एकादशीला भगवान श्रीविष्णुपूजनाचे महत्त्व अधिक आहे. या दिवशी एकादशी माहात्म्य, श्री विष्णुसहस्रनाम वाचावे.

टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याेदयानंतर वार पालटतो.

टीप २ – भद्रा (विष्टी करण), दुर्गाष्टमी, एकादशी, घबाड मुहूर्त, प्रदोष आणि क्षय दिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
    भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
    शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

(१.१०.२०२१)