‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !

आदीशक्तीचे इंद्राक्षी रूप

१. दक्ष प्रजापतीला मान्य नसतांना श्री महाविष्णूच्या संमतीने शिव आणि सती यांचा विवाह होणे

‘आदिशक्तीचा जन्म दक्ष प्रजापतीची मुलगी ‘देवी सती’च्या रूपात होतो. तिचे वडील दक्ष यांना देवी सतीची शिवभक्ती आवडत नसते; मात्र देवी सतीने शिवालाच आपला पती मानलेले असते. शेवटी दक्षाची इच्छा नसतांनाही दक्ष प्रजापतीचे आराध्यदैवत श्रीमहाविष्णूच्या संमतीने शिव आणि सती यांचा विवाह होतो.

२. दक्ष प्रजापतीने केलेल्या यज्ञाच्या वेळी देवी सतीचा अपमान झाल्यामुळे तिने त्याच यज्ञात स्वतःची आहुती देणे

एकदा दक्ष मोठ्या यागाची सिद्धता करतो. त्याला ‘दक्ष यज्ञ’ असेच नाव पडते. दक्ष सर्व देवदेवता यांना यज्ञासाठी आमंत्रित करतो; मात्र शिव आणि सतीला आमंत्रित करत नाही. शिवाची इच्छा नसतांना देवी सती त्या यज्ञाला जाते. त्या यज्ञात दक्ष सर्वांच्या समोर सती आणि शिव यांची अवहेलना करतो. त्याच क्षणी देवी सती तिच्या आदिशक्ति स्वरूपात प्रकट होते. दक्ष आणि सर्व देवदेवता देवीचे ते विश्वरूप पाहून घाबरतात. देवी सती त्या दक्ष यज्ञाच्या अग्नीत स्वतःची आहुती देते.

३. सतीने स्वतःची आहुती दिल्याचे कळल्यावर शिवाला दक्षाचा क्रोध येतो. ‘शिवाच्या या क्रोधातून विश्वात पहिल्यांदा ‘ज्वराची’ उत्पत्ती झाली’, असे विष्णुपुराण सांगते.

४. नारदमुनींनी ज्वरनाशावरील उपाय विचारल्यावर श्रीविष्णूने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती हा त्यावरील उपाय असल्याचे सांगणे

एकदा नारदमुनी पृथ्वीवर विहार करत असतांना माणसांचे रोगांपासून होणारे हाल बघतात. वैकुंठात आल्यावर नारदमुनी भगवान श्रीविष्णूला विचारतात, ‘भगवंता, मनुष्याला व्याधींपासून मुक्त होण्याचा काही मार्ग नाही का ?’ त्यावर श्रीविष्णु नारदाला सांगतात, ‘यावर एक मार्ग आहे. ज्वराची उत्पत्ती शिवाच्या क्रोधातून झाली आहे. ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील.

५. श्रीविष्णूने सांगितलेला ज्वरनाशावरील उपाय सचीपुरंदर ऋषींकडून मनुष्याला उपलब्ध होणे

श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले. इंद्राक्षीची ही स्तुती आता ‘इंद्राक्षी स्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही रोगामध्ये शरिरात दिसून येणारा परिणाम म्हणजे ‘ज्वर’ ! इंद्राक्षी स्तोत्रामध्ये मनुष्याला होणार्‍या आणि होऊ शकणार्‍या सर्व ज्वरांचा उल्लेख केला आहे.

६. कोरोना महामारीचे मुख्य लक्षण ‘ज्वर’ असणे आणि आदिशक्तीने भक्तांना ‘इंद्राक्षी स्तोत्र’रूपी दैवी लस उपलब्ध करून देणे

जानेवारी २०२० पासून संपूर्ण विश्वात ‘कोरोना’ नावाची महामारी चालू झाली. तेव्हापासून जवळजवळ २० मासांमध्ये सगळ्या जगभरात ५० लाख लोकांचा मृत्यू झाला आणि पृथ्वीवर २२ कोटींपेक्षा अधिक लोक ‘कोरोना’ने बाधित झाले. या रोगाचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे ‘ज्वर !’ ही ‘ज्वर’बाधा दूर करण्याची क्षमता केवळ आदिशक्तीमध्ये आहे. आदिशक्तीनेच भक्तांना ‘इंद्राक्षी स्तोत्र’रूपी दैवी लस उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आम्ही सर्व सनातनचे साधक भगवान श्रीविष्णु आणि आदिशक्ती यांच्या प्रती कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, जयपूर, राजस्थान. (१७.०९.२०२१)