व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारी मनोवृत्ती घातक !
अमली पदार्थविरोधी पथकाने प्रसिद्ध चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांचे सेवन आणि ते बाळगल्याच्या प्रकरणी अटक केली. या कारवाईनंतर ‘बॉलिवूड’मधील अनेक अभिनेते, तसेच शाहरुख खान यांचे चाहते आर्यन याचे समर्थन करत आहेत. स्वत: शाहरुख खानही आर्यनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ष १९९७ मध्ये अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्या ‘टॉक शो’मध्ये दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान म्हणाले होते, ‘माझ्या मुलालाही अमली पदार्थांचा अनुभव असायला हवा. मी जे तारुण्यात करू शकलो नाही, ती सर्व कामे त्याने करावीत. सेक्स करावे, अमली पदार्थांचाही आनंद लुटायला हवा.’ स्वतःच्या मुलाविषयी असे बोलणार्या शाहरुख खान यांचा कोणता आदर्श तरुण पिढीने घ्यायचा ? उलट शाहरुख यांच्या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कारच घातला पाहिजे; परंतु दुर्दैवाने आज अशा मनोवृत्तीच्या समर्थनार्थ ‘ट्विटर’वर ‘ट्रेंड’ चालवण्यात येत आहेत. असे समर्थन करणारे समाजद्रोहीच म्हणायला हवेत. आर्यन याचे समर्थन करतांना एका अभिनेत्याने ‘तो केवळ २३ वर्षांचा असून तो लहान आणि निरागस आहे’, अशी मखलाशी केली आहे. या समर्थनाला काय म्हणावे ? देशासाठी हुतात्मा होणारे काही सैनिक तर आर्यनपेक्षाही अल्प वयाचे असतात. लहान वयातच मातृभूमीसाठी त्याग करण्याचा त्यांचा निर्धार असतो. देशाच्या तरुण पिढीला अशा आदर्शांची आवश्यकता आहे, व्यसनाधीन युवकांची नाही. व्यसनाधीनतेचे समर्थन होणे, यातून देशाची तरुण पिढी भरकटत चालली आहे, हे यातून दिसून येते.
दुसरीकडे काही चाहत्यांनी शाहरुख खान यांना सुनावलेही आहे. काही प्रमाणात का होईना; हीसुद्धा जमेची बाजू आहे. राष्ट्रप्रेमी नागरिकांनीही आर्यन खानवर कठोर कारवाई करण्याविषयी ‘ट्विटर ट्रेंड’ चालवला. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशा प्रकारे संघटित होऊन अमली पदार्थांचे समर्थन करणार्यांवर बहिष्कार घालायला हवा. अमली पदार्थांच्या व्यवहारामुळे पुष्कळ प्रमाणात ‘काळा पैसा’ एकत्र होत असतो. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते. याचे परिणाम भयावह आहेत. त्यामुळे जागरूक नागरिकांनी समाजघातकी वृत्ती मोडून काढायलाच हवी !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई