श्री भवानीदेवीचे आगमन झाल्यानंतर साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री भवानीदेवी

१. प्रथम प्रार्थना करून श्री भवानीदेवीची मूर्ती उचलल्यावर ती सहज उचलता येणे, तेव्हा कर्तेपणाचा विचार मनात येणे, मूर्ती सजवून झाल्यावर उचलतांना ती पुष्कळ जड झाल्याचे जाणवणे आणि त्यातून देवीने अहंच्या विचाराची जाणीव करून देणे, त्यानंतर देवीला प्रार्थना केल्यावर मूर्ती उचलली जाणे : ‘२०.१.२०२० या दिवशी मला भवानीदेवीची मूर्ती उचलण्याची सेवा मिळाली. मी भवानीदेवीला प्रार्थना करून मूर्ती उचलली. तेव्हा मला मूर्ती सहज उचलता आली. तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला, ‘आपण मूर्ती सहज उचलू शकतो.’ मूर्ती सजवून झाल्यानंतर आम्ही मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती पुष्कळ जड झाल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘देवीने मूर्ती जड करून माझ्यातील ‘कर्तेपणा घेणे’, या अहंच्या पैलूची मला जाणीव करून दिली. त्यानंतर मूर्ती उचलण्यापूर्वी मी देवीला प्रार्थना केली आणि नंतर मूर्ती उचलली. तेव्हा देवीने स्वतःचे वजन न्यून केल्याचे मला जाणवले.

श्री. विठ्ठल कदम

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवीचे पूजन करत असतांना देवीच्या मुखात पालट होणे, ‘देवी त्यांना भेटण्यास आतुर झाली आहे’, असे जाणवणे आणि तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यावर क्षात्रतेज जाणवणे : देवीची मूर्ती सजवून झाल्यावर देवीची मिरवणूक जेथून चालू होणार होती, तेथे मूर्ती नेण्यात आली. मिरवणुकीच्या आरंभी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) तिचे पूजन केले. देवीचे पूजन चालू असतांना तिच्या मुखामध्ये पालट झाला आणि ‘देवी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना भेटण्यासाठी आतुर झाली आहे’, असे मला जाणवले. त्या दिवसापासून मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंच्या तोंडवळ्यावर भवानीदेवीचे क्षात्रतेज जाणवू लागले आहे.

३. श्री भवानीदेवीची मूर्ती उचलण्याची सेवा केल्यानंतर सर्व त्रास आणि मनातील नकारात्मकता नष्ट होणे अन् साधना करण्याची स्फूर्ती मिळणे : श्री भवानीदेवीची मूर्ती उचलण्याची सेवा झाल्यापासून मला हलकेपणा जाणवतो. ‘श्री भवानीदेवीने माझा सर्व त्रास आणि माझ्या मनातील नकारात्मकता नष्ट केली आहे’, असे मला जाणवते. ‘आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून साधना करण्यासाठी पुष्कळ स्फूर्ती मिळत आहे’, असे मला वाटते.’ (२५.१.२०२०)

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक