शक्तिदेवता !
नवरात्रीनिमित्त विशेष सदर…
‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेणार आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया.
विशेष सदराचा मागील भाग पहाण्यासाठी येथ क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517204.html
आश्विन शुक्ल पक्ष तृतीया आणि चतुर्थी (९.१०.२०२१)
३. चंद्रघण्टा हे आदिशक्तीचे तिसर्या दिवशी प्रकट होणारे रूप !
३ अ. चंद्रघण्टा : देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात. देवी चंद्रघण्टा भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते. देवी तिच्या भक्तांच्या जीवनातील भूत, प्रेत आणि पिशाच बाधा दूर करते.
प्रार्थना : ‘हे देवी चंद्रघण्टा, ज्याप्रमाणे तू भक्तांच्या जीवनातील भूत, प्रेत आणि पिशाच बाधा तात्काळ दूर करतेस, त्याप्रमाणे तू आम्हा साधकांना होणार्या वाईट शक्तींचा त्रास दूर करून आमचे रक्षण कर. ‘हे भवभयहारिणी देवी, आम्हाला गुरुसेवेत सदैव तत्पर रहाण्याचा आशीर्वाद दे. जेव्हा आमचे स्वभावदोष अन् अहं उफाळून येतील, तेव्हा आम्हाला सतर्क ठेव आणि त्यांच्यावर चैतन्याचा वार करण्याची शक्ती दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
४. आदिशक्तीचे नवरात्रीतील ४ थ्या दिवशी प्रकट होणारे कुष्मांडा रूप !
४ अ. कुष्मांडा : ‘कूष्म’ म्हणजे स्मितहास्य !’ ‘कुष्मांडा’ (टीप १) म्हणजे केवळ आपल्या स्मितहास्यातून ब्रह्मांडाची उत्पत्ती करणारी ! ‘जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते आणि सर्वत्र अंधकार होता, त्या वेळी देवीने ‘कुष्मांडा’ रूपात केवळ हास्याने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. ‘कुष्मांडा’ हे आदिशक्तीचे आदिस्वरूप आहे. सूर्यमंडलाच्या आत जी शक्ति आहे, तीच ‘कुष्मांडा’ होय !’
(साभार : नवदुर्गा, गीताप्रेस, गोरखपूर)
‘कुष्मांडादेवी अष्टभुजा देवी आहे. संस्कृत भाषेत कोहळ्यालाही ‘कुष्मांड’ म्हटले जाते. कुष्मांडादेवीला कोहळ्याचा बळी अत्यंत प्रिय आहे. कुष्मांडादेवी भक्तांचे रोग, दैन्य आणि शोक दूर करणारी अन् आयुष्यवृद्धीचीही देवता आहे.’
टीप १ – देवीच्या या नावाविषयी अनेक पाठभेद आहेत.
प्रार्थना : ‘हे कुष्मांडा देवी, तू तुझ्या स्मितहास्यातून एका क्षणात ब्रह्मांडाची उत्पत्ती केलीस, तशीच तू हिंदु राष्ट्राची स्थापना कर. हे देवी, आम्ही तुझ्या चरणी शरण आलो आहोत. आम्हा साधकांना गुरुसेवा करण्यासाठी आणि अध्यात्मप्रसार करण्यासाठी निरोगी शरिराची आवश्यकता आहे. हे देवी, तू रोग, दैन्य आणि शोक दूर करणारी आहेस. तू आम्हा साधकांना चांगले आरोग्य दे अन् आमच्याकडून गुरुदेवांची एकनिष्ठेने सेवा करवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१७.९.२०२१)
|