भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !
‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’, शंखवाळ (साकवाळ), मुरगाव यांच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन
सांकवाळ, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’, शंखवाळ (सांकवाळ), मुरगाव यांच्या वतीने शंखवाळ येथील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या श्री. सचित नाईक यांच्या निवासस्थानी ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. विविध कार्यक्रम, तसेच सायंकाळी ७.३० वाजता आरती असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे शंखवाळ येथील तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प करून हा उत्सव साजरा केला जात आहे. या संकल्पाच्या सिद्धीसाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि या उपक्रमात मित्र, सहकुटुंब यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन ‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’ने केले आहे.
शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची पार्श्वभूमी –
- वर्ष १५६० – शंखवाळ येथील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिर पोर्तुगीज राजवटीत वर्ष १५६० मध्ये पाडण्यात आले आणि श्री विजयादुर्गा मंदिराच्या जागी ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ हे चर्च उभारण्यात आले.
- वर्ष १८५६ – ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ चर्च ढगफुटीमुळे नष्ट झाले. अनेक लोकांनी जीवही गमावला. त्यानंतर त्या ठिकाणी परत कधीच चर्च बांधण्यात आले नाही.
- वर्ष १९८३ – ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ असे नाव असलेल्या या ठिकाणाला गोवा शासनाने वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
- वर्ष २०१४ – सांकवाळ येथील सेंट जोसेफ वाझ या ठिकाणच्या चर्चच्या व्यवस्थापनाने वारसा स्थळाच्या १०० मीटर परिसरात अनधिकृतपणे बांधकाम केले आणि वर्ष २०१४ मध्ये स्थळाच्या ठिकाणी भाविक पूजाअर्चा करत असलेले वडाचे झाड कापून टाकले. (वारसा स्थळाच्या जागी अशा प्रकारे अनधिकृतरित्या बांधकाम करूनही पुरातत्व खाते गप्प कसे ? ख्रिस्त्यांच्या गुंडगिरीला घाबरून प्रशासन कारवाई करत नाही का ? ख्रिस्त्यांच्या मतांसाठी लोकप्रतिनिधीही गप्प बसतात ! – संपादक)
- वर्ष २०१७ – मंदिराचे पुरातन दगड भूमीत पुरण्यात आले
- वर्ष २०१८ – वारसा स्थळाच्या ठिकाणी अनधिकृतपणे सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे आयोजन करण्यात आले आणि चर्चच्या पाद्र्याने स्थळाकडे जाणार्या मुख्य दरवाज्याला कुलूप ठोकले. यानंतर वर्ष २०१९ आणि वर्ष २०२० मध्ये पोलीस संरक्षणात वारसा स्थळाच्या ठिकाणी अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन करण्यात आले. (यातून चर्चचा संस्थेचा उद्दामपणा दिसून येतो. यांना धर्मनिरपेक्ष म्हणता येईल का ? – संपादक)
- मार्च २०१९ – ‘वॉकिंग पिलिग्रीमेज’चे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले.
- ३० डिसेंबर २०२० – श्री विजयदुर्गादेवीच्या भक्तांनी मार्गशीर्ष पौर्णिमेला पुरातन मंदिराच्या ठिकाणी वार्षिक पुजेचे आयोजन केले आणि याला स्थानिक पाद्र्याच्या नेतृत्वाखाली शिंदोळी येथील ग्रामस्थांनी विरोध केला.