(म्हणे) ‘कन्यादान’च्या विज्ञापनाद्वारे सामान्य नागरिकांच्या मानसिकतेत पालट करण्याचा प्रयत्न केला आहे !’ – वेदांत मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’
हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ या विधीचा अवमान करणार्या विज्ञापनाचे ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’कडून निलाजरे समर्थन
|
मुंबई – आम्ही नेहमीच समाजातील प्रगतीशील महिलांची प्रतिमा दर्शवली आहे. या विज्ञापनाद्वारेही आम्ही संस्कृती आणि सभ्यता यांच्या श्रेष्ठत्वाचे भान राखून सामान्य नागरिकांच्या मानसिकतेत पालट करण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ या आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदांत मोदी यांनी हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ या विधीचा अवमान करणार्या विज्ञापनाचे समर्थन केले. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
काय दाखवले आहे विज्ञापनात ?
कन्येचे श्रेष्ठत्व लक्षात घेऊनच हिंदूंच्या विवाह संस्कारात ‘कन्यादान’ हा महत्त्वाचा धार्मिक विधी करण्यात येतो; मात्र याविषयी काडीचाही अभ्यास नसतांना ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’च्या ‘मान्यवर’ या कपड्यांच्या ‘ब्रँड’च्या (प्रसिद्ध आस्थापनाच्या) विज्ञापनात ‘कन्यादान नको, तर कन्यामान म्हणा’, असे सांगून मुक्ताफळे उधळण्यात आली आहेत.
याविषयी हिंदूंकडून संताप व्यक्त केला जात असून काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’च्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. तथापि ‘वेदांत फॅशन्स लिमिटेड’ने मात्र स्वतःकडून झालेल्या चुकीसाठी हिंदूंची क्षमायाचना करण्याऐवजी या विज्ञापनाचे निलाजरे समर्थन करत हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
(म्हणे) ‘समाजात सकारात्मक पालट करण्याचा संदेश देऊ शकल्याचा आनंद !’ – आलिया भट, अभिनेत्री
मी या विचारधारेशी एकनिष्ठ आहे. मी या विज्ञापनाचा एक भाग बनले आणि समाजात सकारात्मक पालट करण्याचा संदेश देऊ शकले, याचा मला आनंद आहे. (हिंदु धर्माशी काही देणेघेणे नसणार्यांना हिंदु धर्मातील ‘कन्यादान’ विधीचे महत्त्व काय समजणार ? अशांच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घालून त्यांना हिंदूऐक्याची चुणूक दाखवावी ! – संपादक)