मुंबईतील ६ किल्ल्यांचा एकत्रित विकास आराखडा सादर करावा ! – अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री
मुंबई – मुंबईतील शिवडी, वरळी, वांद्रे, धारावी, सेंट जॉर्ज आणि माहीम अशा ६ किल्ल्यांसाठी एकत्रित विकास आराखडा तातडीने सिद्ध करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख दिले आहेत. गड-किल्ले यांच्या संवर्धनाविषयी ५ ऑक्टोबर या दिवशी अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांसह सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील एकूण सागरी किल्ले आणि राज्य संरक्षित किल्ले अशा एकूण ६० किल्लांचा विकास आराखडाही येत्या ८ दिवसांत सादर करावा, तसेच राज्यातील १८ संरक्षित किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामाचा अहवालही तातडीने सिद्ध करावा, असे निर्देशही देशमुख यांनी या बैठकीत दिले. लातूर जिल्ह्यातील औसा आणि उद्गीर या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता या वेळी देण्यात आली आहे.