कोरोनाचे सावट कायमस्वरूपी जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना !
मुंबई – घटस्थापनेच्या निमित्ताने ७ ऑक्टोबरच्या सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांच्यासह श्री मुंबादेवीचे दर्शन घेऊन ‘कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे’, अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी त्यांनी हिंदु बांधवांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर सौ. किशोरी पेडणेकर याही या वेळी उपस्थित होत्या.
याविषयी प्रतिक्रिया देतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे चालू ठेवण्याचे दायित्व सर्वांनी पार पाडले पाहिजे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात ठेवून सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजारी यांनी शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिक यांना दर्शनाची व्यवस्था केली. परिसराची स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे, असे केले, तर चांगला आदर्श आपण घालून देऊ शकतो.’’