‘ऑक्सिजन’प्रश्नी गोवा आता स्वयंपूर्ण झाला असून जनतेची मने कलुषित करणार्या शक्तींपासून गोमंतकियांनी सावध रहावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यातील ७ ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांसह एकूण ३५ ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांचे लोकार्पण !
पणजी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घटस्थापनेच्या निमित्ताने ‘व्हर्च्युअल’ (ऑनलाईन) पद्धतीने देशभरात ३५ ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. त्यांपैकी गोव्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ३, म्हापसा जिल्हा रुग्णालयात १, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात २ आणि ‘ई.एस्.आय.’ रुग्णालयात १ मिळून एकूण ७ प्राणवायू प्रकल्प मिळाले आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि ‘ई.एस्.आय.’ रुग्णालय येथील ‘ऑक्सिजन’ प्रकल्पांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उद्घाटन केले. या वेळी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘केंद्राच्या साहाय्याने ‘पी.एम्.केअर्स’ निधीच्या अंतर्गत गोवा शासनाने राज्यात ‘ऑक्सिजन’च्या पुरवठ्याची व्यवस्था स्वयंपूर्ण केली आहे. त्यामुळे यापुढे आरोग्य सेवेत ‘ऑक्सिजन’ची कमतरता भासणार नाही; परंतु राज्यात मानवनिर्मित आपत्ती निर्माण करणार्या शक्तींनी प्रवेश केला आहे. गोमंतकियांची मने कलुषित करण्याचे प्रकार चालू झाले आहेत. या मानवनिर्मित आपत्तीपासून जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राज्यात कोरोना महामारीच्या काळात बरीच आपत्ती निर्माण झाली आणि यावर आरोग्य खात्याने मात केली; मात्र सध्या मानवनिर्मित आपत्ती निर्माण करणार्या शक्तींनी गोव्यात प्रवेश केला आहे. यामुळे लोकांना मोठा धोका संभवत आहे.’’
या वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘राज्यात आरोग्य सेवेने कोरोना महामारीच्या काळात मोठे आव्हान स्वीकारले होते. आरोग्य सेवेतील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनी जोखीम पत्करून टप्प्याटप्प्याने कोरोनावर मात केली. आता आरोग्य खाते आरोग्य सेवेत सक्षम झाले आहे.’’ म्हापसा येथे उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ प्रकल्पाचे आमदार ग्लेन टिकलो आणि आमदार जोशुआ डिसोझा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे २४० खाटांच्या या रुग्णालयातील ‘ऑक्सिजन’ची कमतरता दूर होणार आहे.