सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय मासेमारांची घुसखोरी : मासेमारांत संघर्ष होण्याची शक्यता

प्रतीकात्मक छायाचित्र

मालवण – मासेमारीचा हंगाम चालू होताच यांत्रिक नौकांसह परप्रांतीय मासेमारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अवैधरित्या घुसखोरी करून मासेमारी करण्यास प्रारंभ केला आहे. मालवण येथील ‘रॉकगार्डन’ नजीकच्या समुद्रात १०० हून अधिक परप्रांतीय यांत्रिक नौका निदर्शनास आल्याने स्थानिक मासेमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात स्थानिक मासेमार आणि परप्रांतीय मासेमार यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मासेमारी हंगाम चालू झाल्याने स्थानिक मासेमार मासेमारीचा प्रयत्न करत आहेत; मात्र पालटलेल्या वातावरणामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यातच परप्रांतीय मासेमारांनी यांत्रिक नौकांसह घुसखोरी केल्याने स्थानिक मासेमारांच्या व्यवसायावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागला आहे. ६ ऑक्टोबरला १०० हून अधिक परप्रांतीय नौका येथील समुद्रात मासेमारांना दिसल्या; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने गस्तीनौका पाठवून या नौकांवर कारवाई करावी, अशी मागणी मासेमारांचे नेते बाबी जोगी यांनी केली आहे.