ब्राह्मणद्वेषी संघटनांचा पोटशूळ !
‘राजमाता जिजाऊ, समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले’, या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमातील विधानामुळे ब्राह्मणद्वेषी व्यक्ती आणि संघटना यांना पोटशूळ उठला. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी या ब्राह्मण व्यक्तींना हटवण्यासाठी जात्यंध कार्यरत आहेत. याच ब्राह्मणद्वेषी कटकारस्थानाच्या अंतर्गत जात्यंध टोळीने राजकीय पाठिंब्याच्या बळावर जानेवारी २००४ मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराची नासधूस केली होती, तसेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना धमक्या दिल्या होत्या. या झुंडशाहीमुळे सत्य इतिहासाचे पाठीराखे असणार्यांकडूनही कधीकधी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात मोलाचे योगदान असणारे दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा थेट नामोल्लेख टाळण्याकडे कल असायचा. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी पुणे शहरातील एका जाहीर कार्यक्रमात त्या अनुषंगाने वक्तव्य करणे महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह आहे.’