जनताभिमुख लोकप्रतिनिधी हवेत !
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ‘हसन मुश्रीफ आणि त्यांचे जावई यांनी १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे’, असा आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी मुरगूड (जिल्हा कोल्हापूर) येथील पोलीस ठाण्यात मुश्रीफ आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली अन् त्याविषयीचे पुरावेही दिले. गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या हीच माहिती देण्यासाठी कोल्हापूर येथे आले. त्या वेळी तर जे काही घडले, ते संपूर्ण राज्यानेच पाहिले. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास विरोध दर्शवला होता.
आतापर्यंत अनेक प्रकरणांतून असे लक्षात आले आहे की, ज्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असतात, त्यांना लोकप्रतिनिधींकडून विविध स्तरांवर विरोध करण्याचा भाग होत असतो. अशा प्रकारे विरोध करणे म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणीच घातल्यासारखेच आहे. यामध्ये माध्यमांचीही भूमिका ही विरोधाला खतपाणी घालणारी आणि राजकारणाचे तुष्टीकरण करणारी आहे. माध्यमांनी जनसामान्यांना काय आवश्यक आहे, ते दाखवणे आणि निष्पक्षपणे वृत्तांकन करणे अपेक्षित असते; पण असे दिसत नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विविध मंत्री, आमदार आणि खासदार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडे (‘ईडी’कडे) लोकप्रतिनिधींकडून भ्रष्टाचाराचे पुरावे अन् तक्रारी देण्यात येत आहेत; म्हणून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून गदारोळ करत असतात. यातून समाजात चुकीचा संदेश जात असून ते अन्वेषण यंत्रणांची भीती का बाळगतात ? अन्वेषण यंत्रणा आणि न्यायालय यांवर लोकप्रतिनिधी अन् कार्यकर्ते यांचा विश्वास नाही का ? खरेतर जनतेने आमदार आणि खासदार यांना विकासकामे करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवून विकासकामांकडे लक्ष दिले, तर ते जनताभिमुख होईल, हेच खरे !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.