‘आई राजा उदो उदो’च्या गजरात श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात घटस्थापना !
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर उघडल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ७ ऑक्टोबर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या तुळजापूर येथील मंदिरात ७ ऑक्टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता घटस्थापना करण्यात आली. ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी संबळाच्या आणि हलगीच्या निनादात घट कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पुजारी, मानकरी, मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शासनाने भाविकांसाठी मंदिर उघडण्याची घोषणा केल्यानंतर मंदिर प्रशासनाने मागील ८ दिवसांपासून तुळजापूर येथे सिद्धता चालू केली होती.
१. शारदीय नवरात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून तुळजापूर नगरीत भाविकांची वर्दळ वाढली आहे.
२. मंचकी निद्रा संपवून कुलस्वामानी श्री तुळजाभवानीदेवी ७ ऑक्टोबरच्या पहाटे सिंहासनावर विराजमान झाली. त्यानंतर अभिषेक आणि पूजा करण्यात आली. मंदिर प्रशासनाने प्रतिदिन १५ सहस्र भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८ ऑक्टोबरपासून १५ सहस्र भाविकांना कोरोना संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. ७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ करण्यात आला.