रुग्णाईत स्थितीतही प्रत्येक श्वासासहित गुरुस्मरण करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

सौ. प्रमिला केसरकर

१. सौ. प्रमिला केसरकरकाकूंच्या खोलीत जाणवलेले पालट

अ. ‘सप्टेंबर २०२१ मध्ये सौ. प्रमिला रामदास केसरकरकाकू रुग्णाईत असतांना मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले होते. काकूंची खोली आकारमानाने लहान आहे; परंतु खोली आकारमानापेक्षा अधिक मोठी वाटत होती.

आ. काकूंचा पलंग प्रकाशमान दिसत होता. पलंगाच्या कडा दंडदीप (ट्यूबलाईट) लावल्याप्रमाणे अधिक प्रकाशमान दिसत होत्या.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२. सौ. प्रमिला केसरकरकाकूंमध्ये जाणवलेले पालट

अ. काकूंना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद दिसत होता.

आ. त्यांचे डोळे पुष्कळ लांबचे दृश्य पहात असल्याप्रमाणे जाणवत होते.

इ. काकूंचा हात हातात घेतल्यावर मला त्यांच्या हाताचा स्पर्श कापसाप्रमाणे मऊ जाणवला.

ई. काकू रुग्णाईत असूनही त्यांच्या मुखातून पुष्कळ सुगंध येत होता.

उ. त्या मला त्यांना लाभलेल्या सत्संगाविषयी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या; पण त्यांची प्राणशक्ती अल्प असल्याने त्यांना अशक्तपणा होता. त्या शब्दांत पुष्कळ सांगू शकत नव्हत्या, तरी त्यांचा सहवास, प्रत्येक श्वास आणि पेशीपेशी यांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निर्माण झालेले अस्तित्व भगवंत मला सतत अनुभवायला देत होता.

३. अनुभूती 

अ. काकूंच्या पलंगाजवळ जाताच माझी भावजागृती होऊन माझ्या शरिरावर रोमांच येऊ लागले. त्यांच्याकडे पहातांना माझी सतत भावजागृती होत असल्याने ‘काकूंकडे केवळ पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

आ. काकूंनी जेमतेम २ – ३ शब्द प्रयत्नपूर्वक उच्चारले. काकूंना होणार्‍या शारीरिक वेदनांमुळे त्यांच्या तोंडातून श्वासाचा ध्वनी मधे मधे ऐकू येत होता. त्या वेळी ‘त्यांच्या मुखातून सूक्ष्मातून ‘परम पूज्य’ हे शब्द वातावरणात तरंगांप्रमाणे बाहेर पडत आहेत’, असे मला दिसले. उदबत्तीचा धूर हवेत दरवळतो, तसे ते शब्द काकूंच्या मुखातून बाहेर पडत असल्याचे मला दिसत होते.

इ. त्यांच्या खोलीत मला भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सातत्याने अनुभवायला येत होते.

४. प्रार्थना

‘हे गुरुराया, काकूंच्या भावभक्तीमुळे त्यांची पेशीन्पेशी अन् श्वासन्श्वास तुमच्या चरणी समर्पित आहे. तुम्ही मलाही तसे घडवा. माझ्याकडून तुम्हीच त्याप्रमाणे प्रयत्न करवून घ्या आणि माझ्यावर कृपा करा.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक