श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीपूर्ण वातावरणात साजरा !
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच ६ ऑक्टोबर २०२१ या दिवशी आश्रमातील साधकांनी कृतज्ञताभावात साजरा केला. या मंगलप्रसंगी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी साधनेविषयी भावपूर्ण कथन केल्याने उपस्थित साधक भक्तीभावाने न्हाऊन निघाले.
असा झाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस !
आश्रमातील साधक आणि बालसाधक यांनी एका खोलीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी पत्रांची भावपूर्ण रचना केली होती. त्या खोलीतील वातानुकूलन यंत्राचा थंडावा तपासण्याच्या कारणाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना बोलावण्यात आले. त्या खोलीत आल्यानंतर साधकांना खोलीत पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. यानंतर साधकांनी ‘परब्रह्मरूपिणी माता महालक्ष्मी जय जय जय’ हे देवीविषयी भक्ती वाढवणारे गीत लावले. हे गीत ऐकत असतांना उपस्थित साधकांची भावजागृती झाली, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई ही कृतज्ञतापत्रे पहात असतांना काही साधकांना सूक्ष्म गंधासह विविध वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्या.
या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना दिलेल्या अनेक कृतज्ञतापत्रांमधील २ पत्रे वाचून दाखवण्यात आली. पहिले कृतज्ञतापत्र वाचत असतांना उपस्थित साधकांचा कृतज्ञताभाव जागृत झाला. हे कृतज्ञतापत्र म्हणजे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे साधकवत्सल स्वरूपातील आध्यात्मिक कार्याचे वैशिष्ट्य दर्शवणारे होते. यानंतर दुसरे कृतज्ञतापत्र वाचून दाखवण्यात आले. दुसरे कृतज्ञतापत्र हे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या सूक्ष्मातील आध्यात्मिक कार्याचे वैशिष्ट्य दर्शवणारे होते.
साधकांनी साधनेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केल्यास त्यांची जलद आध्यात्मिक प्रगती होईल ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळश्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अनमोल विचारधन या शुभप्रसंगी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी उपस्थित साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘आश्रमातील दैवी बालसाधक परात्पर गुरुदेवांच्या कृपेने साधनेमध्ये प्रगती करत आहेत. त्यांच्यातील आध्यात्मिक विचारांच्या स्तरामुळे ते लवकर पुढे जात आहेत. त्याचप्रमाणे सर्व साधकांनी मानसिक स्तरावर रहाणे सोडून आध्यात्मिक स्तरावरील विचार करायला हवा. साधकांच्या साधनेमध्ये छोटे छोटे अडथळे आहेत. यांमुळे आपली आध्यात्मिक प्रगती खुंटते. त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण तळमळीने प्रयत्न केले, तर आपली जलद आध्यात्मिक प्रगती होईल. ‘विश्वातील सर्व साधकांनी साधनेत पुढे जावे’, अशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तीव्र तळमळ असून ते साधकांच्या प्रगतीची आतुरतेने वाट पहात आहेत’’, या मार्गदर्शनामुळे साधकांना साधनेची पुढील दिशा मिळण्यासह प्रोत्साहन मिळाले. एकूणच साधकांना आध्यात्मिकदृष्ट्या हलके झाल्यासारखे वाटत होते. |
सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.