कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाही गोव्यात नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार
पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात यंदाही नवरात्रोत्सव बहुतेक ठिकाणी साध्या पद्धतीनेच साजरा केला जाणार आहे. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीची मात्रा (डोस) सर्व पात्र नागरिकांनी घेतल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे, तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग अल्प होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने सण-उत्सव साजरे करण्यासाठीचे निर्बंध हटवले आहेत.
मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानने नवरात्रोत्सव आणि दसरा कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत आणि यामध्ये अन्नसंतर्पणाचे आयोजन न करणे, रात्री ७ वाजल्यानंतर मंदिराच्या प्राकारात (परिसरात) भाविकांसाठी मर्यादित प्रवेश असणे, मंदिरातील कीर्तन आणि मखरोत्सव ‘ऑनलाईन’ पहाण्याची सोय उपलब्ध करणे आदी तरतुदी आहेत.
कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानने सिमोल्लंघन पालखी मिरवणुकीत भाविकांना सहभागी होण्यास निर्बंध घातले आहेत. गोव्यातील गुजराती समाजानेही नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. पणजी येथील गुजराती समाजाचे अध्यक्ष काजल शहा म्हणाले, ‘‘यंदा नवरात्रोत्सवाची प्रसिद्धी केली जाणार नाही, तसेच या कार्यक्रमाला राजकारणी, नामांकित व्यक्ती आदींना बोलावणार नाही, तसेच बँडवादनही असणार नाही. केवळ मंदिरात धार्मिक पूजा करण्यात येईल.’’ गुजराती समाजातील अन्य काही लोकांनी मर्यादित स्वरूपात नवरात्रोत्सव कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.