नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘बालसंस्कार डॉट कॉम’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !
मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषिक विद्यार्थ्यांसह जिज्ञासूंचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुंबई, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्र हे व्रत प्राचीन काळापासून केले जाते. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा आध्यात्मिक लाभ करून घेण्यासाठी या काळात देवीचा नामजप, तसेच घटस्थापना, कुंकूमार्चन, ओटी भरणे, कुमारिकापूजन, अखंड दीप तेवत ठेवणे, अशा विविध धार्मिक कृती केल्या जातात; मात्र या कृतींमागील शास्त्र नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवापिढीच्या लक्षात यावे यांसाठी नवरात्रोत्सवाविषयी २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या ‘बालसंस्कार डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे.
ही प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध असून त्या त्या भाषांतील जिज्ञासूंकडून सोडवण्यात येत आहे. प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषेमध्ये ‘श्रीरामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने कुणी श्रीरामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले ?’, ‘द्वापरयुगामध्ये पांडवांनी अज्ञातवासात असतांना एका रात्रीत कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे कुठल्या देवीचे मंदिर बांधले ?’, ‘गरबा नृत्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी कोणती गीते गायला हवीत ?’, ‘सरस्वतीदेवीच्या हातातील जपमाळ हे कशाचे प्रतीक आहे ?’ यांसारखे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत.
विशेष
‘हिंदु जनजागृती समिती सातत्याने प्रत्येक सणाच्या निमित्ताने अशा प्रकारे प्रश्नमंजुषा उपलब्ध करून देत असून त्यामुळे त्या सणांच्या वेळी धार्मिक कृतींमागील शास्त्र समजण्यास साहाय्य होते’, अशी प्रतिक्रिया जिज्ञासूंची आहे.
प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी भाषेनुसार लिंक
१. मराठी – http://balsanskar.com/marathi/navaratri-quiz २. हिंदी – http://balsanskar.com/hindi/navaratri-quiz ३. कन्नड – http://balsanskar.com/kannada/navaratri-quiz ४. इंग्रजी – http://balsanskar.com/navaratri-quiz |